Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील आंबेडकर नगर येथे सोमवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर आणि साउंड बॉक्सेस उभारण्यात आले होते. याच परिसरात तीन वर्षांची चिमुकली खेळत असताना...
Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल
(Photo-X)
Published on

मुंबईतील विक्रोळी परिसरात लाऊडस्पीकर कोसळून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप चिमुकलीचा जीव गेल्याचे व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

निष्काळजीपणामुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील आंबेडकर नगर येथे सोमवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर आणि साउंड बॉक्सेस उभारण्यात आले होते. याच परिसरात तीन वर्षांची चिमुकली खेळत असताना बाजूला ठेवलेला अवजड लाऊडस्पीकर अचानक तिच्या अंगावर कोसळला. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली.

घटना सीसीटीव्हीत कैद

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक व्यक्ती डोक्यावर गाठोडं घेऊन चालताना दिसत असून, त्याच्या मागे ही चिमुकली खेळत होती. चालत असताना त्या व्यक्तीच्या डोक्यावरील गाठोडं लाऊडस्पीकरच्या वायरला अडकते आणि क्षणातच अवजड लाऊडस्पीकर थेट मुलीच्या अंगावर कोसळतो. ही घटना घडताच तो व्यक्ती तिथून निघून जातो, तर आजूबाजूचे नागरिक घाबरलेल्या अवस्थेत जखमी मुलीच्या अंगावर पडलेला स्पीकर उचलताना दिसतात.

यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगा गंभीर जखमी अवस्थेतील चिमुकलीला उचलून धावताना दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा तपास सुरू आहे. कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर उभारताना सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

कुर्ल्यात कचराकुंडीत नवजात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबईतील आणखी एक मन हेलावून टाकणारी घटना कुर्ला परिसरातून समोर आली आहे. कुर्ल्यातील जरीमरी परिसरात विमानतळाच्या भिंतीजवळ असलेल्या एका कचराकुंडीत नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, कचरा टाकण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला कचराकुंडीत ब्लँकेटमधून बाहेर आलेला एक हात दिसला. संशय आल्याने जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्याला ते नवजात बाळ असल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने आजूबाजूच्या लोकांना बोलावून पोलिसांना माहिती दिली. पोलिस येईपर्यंत तो घटनास्थळीच थांबून राहिला.

माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे. पालकांची ओळख पटल्यावर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

उपआयुक्त पोलीस दत्ता लालवडे यांनी मिड-डेशीशी बोलताना सांगितले, “माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. नवजात बाळाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासले जात आहे.”

logo
marathi.freepressjournal.in