मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरु असून गुरुवारी सात धरणापैकी आणखी एक मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला. धरण क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरु असल्याने सातही धरणातील पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा पाणीसाठा मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका उपलब्ध झाल्याने सोमवार २९ जुलैपासून पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दैनिक नवशक्ति'शी बोलताना सांगितले.
जून महिना कोरडा गेल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाली आणि मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पावसाची कृपादृष्टी झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. २० जुलैला सकाळी ८.३० वाजता तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला, तर २४ जुलै रोजी तानसा तलाव दुपारी ४.१६ ओसंडून वाहू लागला त्यापाठोपाठ २५ जुलैला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला. तर गुरुवार २५ जुलै रोजी सकाळी १०.४० वाजता मोडक सागर ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा सात धरणापैकी ४ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे सोमवार २९ जुलैपासून मुंबईवरील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आल्याचे, गगराणी यांनी सांगितले.
२५ जुलै रोजी पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - ७७,४८४
मोडक सागर - १,२७,१९२
तानसा - १,४३,८८७
मध्य वैतरणा - १,२२,५४९
भातसा - ४,५९,५३९
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६
तीन वर्षांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
२०२४ - ९,६६,३९५
२०२३ - ७,९८,७०४
२०२२ - १२,८९,४३५