

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पाऊल बरसत असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सातही धरणात १९ जुलै रोजी ५२.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २९.४७ टक्के पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पावसाची ओढ कायम असून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. मात्र गेला आठवडाभर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात वरुणराजाच्या जोरदार बॅटिंगची गरज आहे. गेल्या वर्षी १९ जुलैला सातही धरणातील पाणीसाठा ८१.८६ टक्के इतका होता. मात्र, यंदाच्या १९ जुलै २०२६ रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५२.३९ टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के पाणीसाठा कमी असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
अपुऱ्या पाणीसाठ्याचे टेन्शन
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १९ जुलैला ७ लाख ५८ हजार २४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरण क्षेत्रात जोरदार पाऊस बरसणे गरजेचे आहे.
तीन वर्षांतील पाणीसाठा ( टक्क्यात)
२०२६ - ५५.३९
२०२५ - ८१.८६
२०२४ - ३९.२३
१९ जुलै रोजी धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस ( मिमी)
अप्पर वैतरणा - ५५.०० मिमी
मोडक सागर - ४४.०० मिमी
तानसा - ७५.०० मिमी
मध्य वैतरणा - ५४.०० मिमी
भातसा - ११२.०० मिमी
विहार - ३१.०० मिमी
तुळशी - ४२.०० मिमी