

मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उकाडा तीव्र होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.
उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, १० आणि ११ एप्रिल रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
१० एप्रिल रोजी कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सियस तर किमान तापमान २४ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. ११ एप्रिल रोजी उष्णता वाढून तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव
मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही उष्ण आणि दमट हवामान अनुभवायला मिळणार आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव येथे पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
IMDने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या उन्हात बाहेर पडताना उष्माघात आणि त्वचेच्या समस्या होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे नागरिकांनी दीर्घकाळ उन्हात राहणे टाळावे तसेच पुरेसे पाणी प्यावे. बाहेर पडताना सैल आणि आरामदायी कपडे घालावेत तसेच डोक्याचे संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळ यांसारखी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठीही सूचना
दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीसाठी नियमित पाण्याची व्यवस्था (सिंचन) ठेवावी, जेणेकरून पिकांवर उष्णतेचा परिणाम कमी होईल, अशी सूचना देण्यात आली आहे.