Mumbai : विरार लोकलमधील 'जुगाडू सीट' व्हायरल; गर्दीत महिलेने केली बसण्यासाठी भन्नाट युक्ती

मुंबईतील विरार लोकलमध्ये एक महिला गर्दीत बसण्यासाठी फोल्डिंग स्टूलचा वापर करून स्वतःसाठी ‘जुगाडू सीट’ तयार करते, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या हुशारीचे कौतुक केले आहे.
Mumbai : विरार लोकलमधील 'जुगाडू सीट' व्हायरल; गर्दीत महिलेने केली बसण्यासाठी भन्नाट युक्ती
Published on

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दीत बसायला जागा मिळवण्यासाठी एका महिलेने केलेली भन्नाट युक्ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये तिने छोटा फोल्डिंग स्टूल वापरून स्वतःसाठी बसण्याची व्यवस्था केली असून या कल्पकतेचे अनेकांनी कौतुक केले आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ विरारकडे जाणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या लोकलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक व्यस्त प्रवासी रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

बॅगेतून काढला छोटा फोल्डिंग स्टूल...

व्हिडिओमध्ये संबंधित महिला आपल्या बॅगेतून छोटा फोल्डिंग स्टूल बाहेर काढताना दिसते. त्यानंतर डब्यातील उपलब्ध जागेत काळजीपूर्वक तो ठेवून ती त्यावर आरामात बसते. गर्दीच्या वेळी बसायला जागा मिळवण्यासाठी केलेली ही कल्पक युक्ती पाहून आसपासचे प्रवासीही आश्चर्यचकित झाले.

'सीट हवी असेल तर आयडिया पाहिजे'

व्हिडिओमध्ये महिला हसत म्हणताना दिसते, "कोण म्हणतं विरार लोकलमध्ये सीट नाही मिळत..? आयडिया पाहिजे आयडिया .. मग सीटच सीट आहेत.. काय बोलता पब्लिक..!!!" या व्हिडिओवर "विरार लोकल ट्रेनमध्ये सीटचा जुगाड" असा मजकूरही दाखवण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी महिलेच्या हुशारीचे कौतुक केले आहे. काहींनी विनोदी प्रतिक्रिया देत मुंबईतील लोकल प्रवासातील वास्तव अधोरेखित केले. एका वापरकर्त्याने "मेंदूचा योग्य वापर" अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने "ही पब्लिक सगळं जाणते" असे म्हणत कौतुक केले.

मुंबईकरांच्या दैनंदिन 'जुगाड'ची झलक

मुंबई उपनगरी रेल्वेवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी गर्दीच्या वेळी लोकलमधील प्रवास हा रोजचा अनुभव आहे. मर्यादित आसनव्यवस्था आणि मोठ्या प्रमाणातील प्रवासी यामुळे अनेकदा प्रवासी अशा प्रकारच्या कल्पक ‘जुगाड’चा आधार घेत प्रवास अधिक सोयीस्कर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

logo
marathi.freepressjournal.in