मुंबईतील गणेशोत्सव म्हटला की भाविकांची लगबग, गर्दी आणि भव्य देखावे यांचीच आठवण येते. लालबागचा राजा नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असला, तरी मुंबईचा पहिला मान जातो गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' या गणपतीला. यंदा या मंडळाच्या गणेशोत्सवाचे ९८ वे वर्ष असून, आज प्रथम दर्शन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक थीममुळे आधीच प्रतिष्ठित असलेल्या या उत्सवाला अधिक भव्यता लाभली आहे.
गेल्या वर्षी या मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिर उभारण्याची संकल्पना मांडली होती, यंदा रामेश्वरम मंदिर ही थीम करण्यात आली आहे. बाप्पाच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात जास्वंद आहे. तर, मुंबईच्या राजासोबत यंदा हातात शंकराची पिंड घेऊन हनुमान स्वारींचे देखील दर्शन झाले आहे.
मुंबईचा राजा ही उंच, भव्य आणि आकर्षक मूर्ती दरवर्षी हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरते. सजावट आणि मूर्तीचे सौंदर्य पाहण्यासाठी गणेशगल्लीत भाविकांची प्रचंड गर्दी होते. दरम्यान, यंदाच्या प्रथम दर्शनासाठीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला.