अधीक्षक सक्तीच्या रजेवर, डॉक्टर व परिचारिका निलंबित; ICUमध्ये उंदराने हात कुरतडल्याने वृद्धेचा मृत्यू

भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असताना उंदराने हात कुरतडल्याने ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अधीक्षक सक्तीच्या रजेवर, डॉक्टर व परिचारिका निलंबित; ICUमध्ये उंदराने हात कुरतडल्याने वृद्धेचा मृत्यू
Published on

भाईंंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असताना उंदराने हात कुरतडल्याने ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जाफर तडवी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले डॉ. शंतनू कोंडगीर आणि कंत्राटी अधिपरिचारिका नमिता भोनर यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

मीरारोड येथील प्लेझंट पार्क परिसरात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. रविवारी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांचा मुलगा आईला भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेला असता, खाटेवरून एक उंदीर पळून जाताना दिसला. त्यावेळी बेडशीट रक्ताने माखलेली असून उंदराच्या पायांचे रक्ताळलेले ठसेही दिसत असल्याचे सांगण्यात आले.

अधीक्षक सक्तीच्या रजेवर, डॉक्टर व परिचारिका निलंबित; ICUमध्ये उंदराने हात कुरतडल्याने वृद्धेचा मृत्यू
मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

तपासणी केली असता सुहासिनी माठेकर यांच्या हाताला उंदराने कुरतडल्याने जखम झाली होती आणि त्यातून रक्तस्राव होत असल्याचे आढळले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यानच सुहासिनी माठेकर यांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. ठाण्याचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

ठिय्या आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात आंदोलन केले. शिवसेना जिल्हा संघटक निलम ढवण, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, शहराध्यक्ष प्रशांत सावंत, तसेच मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, सचिन पोपळे आदी पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरही टीका करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in