नायगाव : अवघ्या १५ दिवसांपूर्वी आईचं निधन झालं होतं. कुटुंब अजून त्या दुःखातून सावरलंही नव्हतं. अशातच सहा वर्षांच्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने नायगावमधील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील लॉबीमध्ये खेळताना खिडकीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याला दुसऱ्याच दिवशी शिक्षणासाठी महाबळेश्वरच्या हॉस्टेलमध्ये पाठवण्यात येणार होतं. त्यासाठी त्याची बॅगही भरून ठेवली होती. मात्र, त्याआधीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेळताना ११ व्या मजल्यावरून कोसळला
ही घटना मंगळवारी (दि. २४) दुपारी पावणेचारच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्वेकडील नवकार टॉवर सोसायटीमध्ये घडली. मिलीत दिनेशकुमार सुतार (वय ६) असं मृत मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलीत आपल्या घराबाहेरील ११ व्या मजल्यावरील लॉबीमध्ये एका लहान मुलीसोबत खेळत होता. खेळता खेळता तो खिडकीजवळ गेला. यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो खिडकीतून खाली कोसळला. खाली पडताना तो इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेच्या पाईपवर आदळला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. मिलीतला तातडीने वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
हॉस्टेलला जाण्यासाठी बॅगही भरून ठेवली होती
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे, मिलीतच्या आईचं अवघ्या १५ दिवसांपूर्वी निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर त्याचे वडील दिनेशकुमार सुतार यांनी मुलाला पुढील शिक्षणासाठी महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
बुधवारी (दि. २५) सकाळी मिलीतला हॉस्टेलमध्ये सोडण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी त्याची बॅगही भरून ठेवली होती. मात्र, हॉस्टेलला जाण्याच्या आदल्याच दिवशी हा अपघात घडला. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या १५ दिवसांत मुलालाही गमावण्याची वेळ आल्याने सुतार कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात झाला आहे.
याच गृहसंकुलात आधीही चिमुकलीचा मृत्यू
दरम्यान, या दुर्घटनेनंतर सोसायटीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी २२ जुलै २०२५ रोजी नवकार सिटी फेज-१ मध्ये १२ व्या मजल्यावरून पडून चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
त्या घटनेनंतर इमारतींच्या लॉबीमधील खिडक्यांना सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
बिल्डरच्या निष्काळजीपणावर रहिवाशांचा आरोप
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डरच्या कथित निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी इमारतीच्या लॉबीतील खिडक्यांना जाळ्या बसवण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच सोसायटीतील लिफ्टची अवस्थाही खराब असून, एका विंगमधील लिफ्ट बंद असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर बिल्डरच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत असल्याचं संबंधित वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
अवघ्या १५ दिवसांत पत्नी आणि मुलाला गमावलेल्या दिनेशकुमार सुतार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रहिवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.