नायर रुग्णालय लैंगिक छळवणूक: अधिष्ठात्यांची तत्काळ बदली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विशेष चौकशी समिती स्थापन

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल
नायर रुग्णालय लैंगिक छळवणूक: अधिष्ठात्यांची तत्काळ बदली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विशेष चौकशी समिती स्थापन
Published on

मुंबई : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूकप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची तत्काळ बदली करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयात सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

बदली नको निलंबन करा - रईस शेख

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर पालिकेने त्यांची मंगळवारी कूपर रुग्णालयात बदली केली आहे. त्यांची बदली पुरेशी नाही, तर या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी त्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. नायर रुग्णालयाचे डॉ. सुधीर मेढेकर यांच्या बदलीला खूपच उशीर झाला आहे. ते त्यांच्या पदाचा गैरवापर करू शकतात आणि यातील प्रकरणावर प्रभाव टाकू शकतात, असे शेख म्हणाले. दरम्यान, गेल्या महिन्यात शेख यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मेढेकर यांनी कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण केले व खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले नाही. तसेच त्यांच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब केला, असे शेख यांनी नमूद केले होते.

नायर रुग्णालय लैंगिक छळवणूक: अधिष्ठात्यांची तत्काळ बदली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विशेष चौकशी समिती स्थापन
तबेला ते फाइव्ह स्टार, नायर रुग्णालयाचा प्रवास; ९० वर्षे पूर्ण, तळ अधिक ११ मजली अद्ययावत दंत रुग्णालय सेवेत
logo
marathi.freepressjournal.in