

नालासोपाऱ्यातील एका एटीएममध्ये पैसे काढताना ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला. ४ हजार रुपये काढण्याचा व्यवहार केल्यानंतर मशीनमधून केवळ ३ हजार ६०० रुपये बाहेर आल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला आहे. एवढेच नाही, तर मिळालेल्या नोटांमध्ये २०० रुपयांची एक फाटकी नोटही असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
४ हजार रुपये काढले, पण मिळाले कमी
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील गाला नगर परिसरातील हिताची (Hitachi) संचालित UPI कॅश विथड्रॉवल एटीएममध्ये हा प्रकार घडला. संबंधित ग्राहकाने UPI सुविधेद्वारे ४ हजार रुपये काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र मशीनमधून बाहेर आलेले पैसे मोजल्यानंतर त्याला केवळ ३ हजार ६०० रुपये मिळाल्याचे आढळले. याशिवाय त्यामध्ये २०० रुपयांची एक फाटकी नोटही असल्याचा दावा त्याने केला आहे.
ATM केंद्रातच केला व्हिडिओ
रकमेत तफावत आढळताच संबंधित ग्राहकाने तात्काळ याचा व्हिडिओ तयार केला. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्याने मिळालेल्या नोटा पुन्हा मोजल्या आणि संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. बँक आणि एटीएम सेवा पुरवठादाराकडे तक्रार करताना पुरावा म्हणून हा व्हिडिओ उपयोगी पडावा, या उद्देशाने त्याने चित्रीकरण केल्याचे सांगितले जात आहे.
महिनाभरापूर्वी उलट प्रकार
विशेष म्हणजे, वसई-विरार परिसरातील हिताची एटीएमबाबत यापूर्वीही तक्रारी समोर आल्या आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी वसई परिसरातील एका एटीएममध्ये वेगळाच तांत्रिक बिघाड झाल्याची चर्चा होती. त्यावेळी ग्राहकांनी दावा केला होता की, मशीन मागितल्यापेक्षा जास्त रक्कम देत होते. १०० रुपये काढल्यावर ५०० रुपये आणि ४०० रुपये काढल्यावर २ हजार रुपये मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र खात्यातून मूळ मागितलेली रक्कमच वजा होत असल्याचे सांगण्यात आले होते.
चौकशीची मागणी
अल्पावधीतच एकदा जास्त आणि आता कमी पैसे मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची प्रक्रिया, नोटांची तपासणी आणि यंत्रणेची देखभाल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून अशा तांत्रिक बिघाडांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.