

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) चे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदूरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. तसेच, त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मंगळवारी (दि. १८) हा महत्त्वाचा निर्णय दिला. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता अंदूरेलाही जामिन मिळाल्याने या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे सुमारे १३ वर्षांपासून सुरू असलेल्या दाभोलकर हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तथापि, याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पूत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून पुढील कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'अद्याप विस्तृत निर्णय आलेला नाही. तो वाचल्यानंतर पुढे काय करायचं हे ठरवू. यापूर्वी शरद कळसकरला जामीन दिल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता अंदुरेच्या जामिनाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाऊ', असे ते म्हणाले.
दाभोलकरांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर सकाळी फिरायला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
तपास सीबीआयकडे कसा गेला?
दाभोलकर यांच्या हत्येचा सुरुवातीचा तपास पुण्यातील डेक्कन पोलिसांकडून करण्यात आला. त्यानंतर त्यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर २०१४ मध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी
१० मे २०२४ रोजी पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, यूएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत असलेल्या आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुरेशा पुराव्यांअभावी वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचीही सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.
पानसरे हत्या प्रकरणातही खटला सुरू
गोविंद पानसरे यांच्या हत्येतील कथित भूमिकेबद्दलही सचिन अंदुरेविरोधात खटला सुरू आहे. या प्रकरणातही त्याला जामीन मिळाल्याने दाभोलकर आणि पानसरे या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दाभोलकरांनंतर विवेकवादी हत्यांची मालिका
विवेकवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येतील दाभोलकरांची हत्या ही पहिली घटना मानली जाते. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये गोविंद पानसरे, ऑगस्ट २०१५ मध्ये कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि सप्टेंबर २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या घटनांमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.