

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला फुटीचे, तर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या गटाला कुरबुरींचे ग्रहण लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या गटात अंतर्गत कुरबुरींना सुरुवात झाली असतानाच आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाच आव्हान देऊन नव्याने निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांप्रमाणेच आपल्या मतदारसंघात अधिकचा निधी मिळावा यासाठी शरद पवार गटातील काही आमदार, खासदार सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाण्यास आतूर झाल्याचीही चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षातील संघटनात्मक मतभेद आता समोर येऊ लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आणि पार्थ पवार यांच्याकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या वाढल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंब यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांतील उमेदवारी वाटप आणि पक्षाच्या संसाधनांचे वितरण हे सामूहिक निर्णयाऐवजी कुटुंबाशी निष्ठावान व्यक्तींच्या प्रभावाखाली होईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, अजित पवार यांच्या आक्रमक राजकीय वाटाघाटीच्या शैलीअभावी भारतीय जनता पक्षाच्या छायेत राष्ट्रवादी झाकोळली जाईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने त्यांच्या मतदारसंघात आता पुरेसा विकास निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आपले राजकीय स्थान अबाधित राखण्यासाठी सत्तेपासून फार काळ दूर राहता येणार नाही, असा एक प्रबळ मतप्रवाह शरद पवार गटाच्या वर्तुळात आहे. त्यामुळे हा नाराज वर्ग सत्तेत जाण्यास आतूर झाल्याचे बोलले जात असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
सुनेत्रांची निवडणूक बेकायदेशीर असल्याचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या अंतर्गत बंडाचे स्वरूप समोर आले असून पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकांच्या वैधतेलाच कायदेशीर आव्हान दिले आहे. या निवडणुकांमधून सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीला सुधारणात्मक पावले उचलावी लागतील : प्रफुल्ल पटेल
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढणे अत्यंत कठीण असले तरी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षांतर्गत सुधारणात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे सूचक उद्गार ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडक पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत करताना काढले.