Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

मुंबईतील १० वर्षांच्या मुलीच्या फुफ्फुसात तब्बल ७ वर्षे पेनचं झाकण अडकून राहिलं. TB आणि दमा समजून उपचार सुरू राहिले. अखेर शस्त्रक्रिया करून फुफ्फुसाचा भाग काढावा लागला.
Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला
Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढलाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : सततचा खोकला, वजन घटणे आणि वारंवार होणारा न्यूमोनिया... डॉक्टरांनी कधी क्षयरोग (TB), तर कधी दमा असल्याचे सांगत उपचार केले. मात्र, तब्बल सात वर्षांनंतर तपासणी केली असता या सर्व त्रासामागचं खरं कारण समोर आलं. मुलीच्या फुफ्फुसात लहानपणी पेनचं झाकण अडकून राहिलं होतं. उशिरा निदान झाल्यामुळे तिच्या फुफ्फुसाचा एक भाग शस्त्रक्रिया करून काढावा लागला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील धारावी येथे राहणाऱ्या १० वर्षीय मायशा शेख हिच्यासोबत ही घटना घडली. अनेक वर्षे वेगवेगळे उपचार करूनही प्रकृती सुधारत नसल्याने अखेर तपासणीत धक्कादायक सत्य समोर आले.

TB आणि दमा समजून सुरू होते उपचार

मायशाला सतत खोकला, वजन कमी होणे आणि छातीच्या संसर्गाचा त्रास होत होता. सुरुवातीला अनेक डॉक्टरांनी तिला संसर्गजन्य आजार असल्याचा संशय व्यक्त करत अँटिबायोटिक्स दिली. त्यानंतर तिला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. थुंकीच्या तपासणीत TB आढळला नव्हता, तरीही लक्षणांच्या आधारे तिला क्षयरोगावरील औषधोपचार सुरू करण्यात आले. यानंतर एका खासगी रुग्णालयात तिला दमा असल्याचे सांगण्यात आले आणि इनहेलर देण्यात आला. मात्र, उपचार करूनही तिची प्रकृती सुधारत नव्हती.

सिटी स्कॅनमध्ये उलगडलं खरं कारण

अखेर मायशाला एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल (नारायणा हेल्थ) येथे नेण्यात आले. तेथे फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. इंदू खोसला यांनी तिची तपासणी केली. सिटी स्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाचा काही भाग आकसल्याचे दिसून आले. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपी केली असता फुफ्फुसाच्या आत खोलवर पेनचं झाकण अडकलेलं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.

हे झाकण सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ईएनटी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. अतिरिक्त भूल देऊन अखेर पेनचं झाकण बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

फुफ्फुसाचा भाग काढावा लागला

पेनचं झाकण काढल्यानंतर मायशाची प्रकृती सुधारू लागली. न्यूमोनियाही काही प्रमाणात कमी झाला. डॉक्टरांनी काही आठवडे फुफ्फुस पूर्ववत होते का, याची वाट पाहिली. मात्र, दीर्घकाळ संसर्ग राहिल्यामुळे फुफ्फुसाच्या एका भागाचं कायमस्वरूपी नुकसान झालं होतं. त्यामुळे अखेर शस्त्रक्रिया करून तिच्या फुफ्फुसाचा जवळपास एक-तृतीयांश भाग काढावा लागला.

आता मुलगी सुरक्षित

डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर मायशा आता सामान्य आयुष्य जगू शकते. मात्र, योग्य वेळी अचूक निदान झाले असते, तर तिच्या फुफ्फुसाचा भाग काढण्याची वेळ टळली असती.

मायशाची आई मैमूना शेख यांनी सांगितले की, उपचारांवर किती खर्च झाला याचा आता हिशोबही राहिलेला नाही. एका चुकीच्या निदानामुळे मुलीचा जीव धोक्यात आला होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in