लहानगा कळवळत होता, मालक हसत होता; मुंबईमधील अमानुष प्रकार; मुलाच्या अंगावर सोडला खतरनाक 'पिटबुल'|Video

मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द येथे एका व्यक्तीने चक्क आपला पिटबुल जातीचा खतरनाक कुत्रा एका लहान मुलावर सोडला. एवढंच नव्हे तर कुत्रा त्या लहानग्यावर हल्ला करत असताना मालक निर्दयपणे हसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
लहानगा कळवळत होता, मालक हसत होता; मुंबईमधील अमानुष प्रकार; मुलाच्या अंगावर सोडला खतरनाक 'पिटबुल'|Video
Published on

मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द येथे एका व्यक्तीने चक्क आपला पिटबुल जातीचा खतरनाक कुत्रा एका लहान मुलावर सोडला. एवढंच नव्हे तर कुत्रा त्या लहानग्यावर हल्ला करत असताना मालक निर्दयपणे हसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही घटना १७ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मोहम्मद सोहेल खान असे पिटबुल कुत्र्याच्या मालकाचे नाव आहे. तर, हमजा या ११ वर्षांच्या मुलासोबत हा भयावह प्रसंग घडला आहे. या हल्ल्यात मुलाच्या हातावर आणि हनुवटीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

मानखुर्दमधील एका सोसायटीत पार्क केलेल्या रिक्षामध्ये हमजा खेळत होता. यावेळी सोहेल खानने मुद्दाम आपला पिटबुल कुत्रा हमजाच्या अंगावर सोडला. व्हिडिओमध्ये दिसतंय, कुत्रा हमजाच्या चेहऱ्याला चावतोय. पण, हे दृश्य पाहून सोहेल निर्लज्जपणे हसताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये येणाऱ्या आवाजावरून तिथे सोहेलचे इतर सोबतीही असल्याचे समजते. परंतु, उपस्थितांपैकी कोणीही कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न न करता सर्वजण या दृश्याची मजा घेताहेत. हमजा वाचवण्यासाठी सोहेलकडे याचनाही करतोय. शेवटी, हमजाने आपल्या जीवाची सुटका करून तिथून पळ काढला, मात्र कुत्राही त्याच्या मागून पळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

कायदेशीर कारवाई - केवळ नोटीस?

घटनेनंतर मानखुर्द पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून, आरोपी सोहेल खानविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९१, १२५, १२५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तक्रार नोंदवल्यानंतरही फक्त नोटीस देऊन आरोपीला सोडण्यात आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

रेबीज नियंत्रण मोहिम -

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे ५७२६ लोकांचा मृत्यू कुत्र्यांच्या चाव्यामुळे होतो. हा निष्कर्ष ICMR-NIE च्या अभ्यासातून समोर आला आहे. भारतात दरवर्षी सुमारे ९.१ दशलक्ष (९१ लाख) प्राणी चावण्याच्या घटना घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रेबीजमुळे लोकांचा मृत्यू होतो.

logo
marathi.freepressjournal.in