पवई परिसरातील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या ‘आरए स्टुडिओ’मध्ये गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडलेल्या थरारक प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने अभिनयाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावलेल्या १७ अल्पवयीन मुलांना आणि इतर दोघांना ओलीस ठेवलं होतं. तब्बल एक तास चाललेल्या थरार नाट्यानंतर १९ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
PTI ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १.४५ वाजता पवई पोलिसांना फोनवर माहिती मिळाली की, एका स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांसह क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस उपायुक्त (DCP) दत्ता नलावडे यांनी सांगितले, की आरोपी रोहित आर्यने सुमारे १५ वर्षांच्या मुला-मुलींना ‘वेब सिरीजच्या ऑडिशन’साठी बोलावलं होतं. मात्र, नंतर त्याने त्यांना आत बंद करून ठेवले आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये त्याने काही लोकांशी थेट संवाद साधायचा असल्याचं सांगितलं आणि जर त्याला तसे करू दिलं नाही तर तो स्टुडिओला आग लावेल, अशी धमकी दिली.
एअरगन आणि रसायनांसह रोहित आर्य पकडला
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आर्याकडे एअरगन आणि काही संशयास्पद रसायने होती. त्याने स्वतःलाही इजा करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधून त्याला शरण येण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला, पण चर्चा निष्फळ ठरली.
त्यामुळे पोलिसांनी एक पर्यायी मार्ग निवडला. स्टुडिओच्या बाथरूममधून आत प्रवेश करून पोलिसांच्या एका टीमने आरोपीला पकडलं. आत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झाली.
सर्व मुले सुखरूप, पालकांच्या ताब्यात सोपवली
या कारवाईत १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि पोलिसांना मदत करणारा एक व्यक्ती अशा एकूण १९ जणांना वाचवण्यात यश आलं. “सर्व मुले सुरक्षित असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे,” अशी माहिती सह पोलिस आयुक्त सत्यनारायणन यांनी दिली.
मी दहशतवादी नाही, तर...
मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपी रोहित आर्यने काही पालकांना स्वतःचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृतीचं समर्थन करत अनेक धक्कादायक विधानं केली. त्याने सांगितलं की तो आत्महत्या करण्याचा विचार सोडून आता समाजातील काही प्रश्नांवर संवाद साधण्यासाठीच हे पाऊल उचलत आहे. तो म्हणाला, “मी आत्महत्या करण्याऐवजी एक योजना आखली. काही मुलांना ओलीस ठेवलं आहे, पण माझा हेतू कुणालाही इजा करण्याचा नाही. मला फक्त काही लोकांशी थेट बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्या उत्तरांवर प्रतिप्रश्न करायचे आहेत. त्याशिवाय मला काहीच नको. मी दहशतवादी नाही आणि माझी पैशांची मागणी देखील नाही.”
पुढे तो म्हणतो, “मला केवळ चर्चा करायची आहे, म्हणून मी ही कृती केली आहे. ही माझी आखलेली योजना आहे आणि मी ती पूर्ण करणारच. मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल. मी मेलो तरी ही गोष्ट थांबणार नाही. जे होणार आहे ते या मुलांसोबतच होणार.”
त्याने धमकीच्या सुरातही चेतावणी दिली “तुमच्याकडून जर एखादी छोटीशी चूक झाली तर मी या ठिकाणी आग लावेन. मी स्वतः मरेन, पण या मुलांनाही इजा होईल. त्यामुळे मला कोणी जबाबदार धरू नका. मला चिथावू नका, मी कोणालाही नुकसान करणार नाही. मी एक सामान्य माणूस आहे आणि मला थेट बोलायचं आहे.”
या व्हिडिओमधून स्पष्ट होतं की रोहित आर्यच्या मनात काही वैचारिक अस्वस्थता होती आणि त्यातूनच त्याने या अत्यंत धोकादायक मार्गाचा अवलंब केला. पोलिस आता या व्हिडिओची आणि त्यातील वक्तव्यांची सविस्तर तपासणी करत आहेत.