पवईत थरारनाट्य! १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार; सर्व मुलांची सुखरूप सुटका

ऑडिशनच्या बहाण्याने पवई येथील एका स्टुडिओत बोलावण्यात आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवणारा माथेफिरू रोहित आर्य हा पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईनंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली.
पवईत थरारनाट्य! १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार; सर्व मुलांची सुखरूप सुटका
Published on

मुंबई : ऑडिशनच्या बहाण्याने पवई येथील एका स्टुडिओत बोलावण्यात आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवणारा माथेफिरू रोहित आर्य हा पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईनंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. हे थरारनाट्य तब्बल तीन तास सुरू होते. सरकारी कामाचे दोन कोटी रुपये थकीत असल्याने नैराश्यापोटी आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

ओलीस ठेवण्यात आलेल्या पंधरा वर्षांखालील मुलांना गेल्या सहा दिवसांपासून पवईतील ‘महावीर क्लासिक’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘आर ए’ स्टुडिओत बोलावण्यात येत होते. एका वेबसीरिजचा निर्माता असल्याचे सांगत मूळचा पुण्यातील रहिवाशी असलेला आरोपी रोहित आर्य याने या मुलांना येथे बोलावले होते. आपल्या मुलांना चित्रपट, वेबसीरिज आणि मालिकांमध्ये काम मिळेल या आशेने पालकांनी आपल्या मुलांना तेथे पाठवले होते. आज नेहमीप्रमाणे ही मुले या स्टुडिओत गेली. मात्र, दुपारी दीड वाजता मुले नेहमीप्रमाणे जेवणासाठी स्टुडिओबाहेर न आल्याने रोहित आर्य याने मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी काही मुलांचे नातेवाईक घटनास्थळी जमले होते, त्यांच्यात या प्रकारामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पवई पोलिसांना मिळताच त्यांनी डांबलेल्या मुलांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली. पोलिसांचे राखीव पथकही तेथे पोहोचले आणि त्यांनी इमारतीला चारही बाजूला बाजूंनी घेरले. यावेळी ओलीस ठेवलेली मुले अतिशय भेदरली होती आणि आपली सुटका व्हावी, यासाठी काचेतून बाहेर डोकावत मदतीची याचना करीत होती.

सुरुवातीला पोलिसांनी आरोपीशी संभाषण करण्याचा प्रयत्न केला. पण तो पोलिसांना दाद देत नव्हता. तरीही पोलिसांनी त्याच्याशी चर्चा सुरू ठेवली. त्याने डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे त्याच्याशी चर्चा सुरू ठेवत दुसरीकडे पोलीस बाथरूमच्या खिडकीवाटे स्टुडिओत शिरले. पोलिसांना पाहताच आरोपी रोहित आर्य याने आधी डांबून ठेवलेल्या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला अडवले असता त्याने त्याच्याकडील एअरगनने पोलिसांवरच गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीला छातीजवळ गोळी लागून तो जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनास्थळी पोलिसांना एक एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ सापडले. याच रसायनांच्या सहाय्याने आरोपीने स्टुडिओला आग लावण्याचीही धमकी दिली होती. या स्टुडिओचा हॉल आरोपीने भाड्याने घेतला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपी रोहित आर्य याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता. आपल्याला काही महत्त्वाचे बोलायचे आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना बनवली आहे. काही मुलांना मी ओलीस ठेवले आहे. तुमची किरकोळ चूकही मला भडकवू शकते, असे तो या व्हिडीओत बोलताना दिसतो.

सरकारी कामाचे २ कोटी थकीत असल्याने घडवले ओलीस नाट्य

रोहित आर्य याने मांडलेल्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या संकल्पनेला प्रतिसाद देत सरकारने ‘स्वच्छता मॉनिटर’ची दोन कोटींची निविदा मंजूर केली होती. मात्र, या कामाचे त्याचे बिल थकीत होते. अनेक प्रयत्न करूनही कामाचे पैसे न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यासाठी त्याने आझाद मैदानावर आंदोलनही केले होते. मात्र, त्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यातून त्याने या ओलीस नाट्याची योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणली, असे सांगण्यात येते.

पवईत थरारनाट्य! १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार; सर्व मुलांची सुखरूप सुटका
किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आणि प्रसंगावधान राखून ही मोहीम संवेदनशीलतेने हाताळली. आरोपी अतिशय आक्रमक झाला होता. यावेळी मुलांच्या पालकांनीही संयम बाळगत पोलिसांना सहकार्य केले. याबाबत अधिक तपास सुरू आहे. - दत्ता नलावडे, पोलीस उपायुक्त

logo
marathi.freepressjournal.in