किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मुंबईतील पवई येथे गुरुवारी (दि. ३०) दुपारी रोहित आर्य या व्यक्तीने १७ अल्पवयीन मुले आणि दोन व्यक्तींना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली, मात्र या चकमकीत रोहित आर्य ठार झाला. ही घटना आता शिक्षण विभागाशी संबंधित आर्थिक वादातून घडल्याची माहिती समोर येत आहे.
किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...
Published on

मुंबईतील पवई येथे गुरुवारी (दि. ३०) दुपारी रोहित आर्य या व्यक्तीने १७ अल्पवयीन मुले आणि दोन व्यक्तींना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली, मात्र या चकमकीत रोहित आर्य ठार झाला. ही घटना आता शिक्षण विभागाशी संबंधित आर्थिक वादातून घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव समोर आले असून त्यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मी स्वत: चेकने पैसे दिले - दीपक केसरकर

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले, “रोहित आर्य हे ‘स्वच्छता मॉनिटर’ नावाची एक योजना चालवत होते. ते ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या प्रकल्पातही सहभागी झाले होते. त्या संदर्भात विभागाकडून अशी माहिती मिळाली की त्यांनी काही मुलांकडून फी वसूल केली होती. मात्र आर्य यांनी हे आरोप नाकारले होते. जर त्यांचा काही दावा असेल, तर तो त्यांनी विभागाशी चर्चा करून कागदपत्रांसह सादर करायला हवा होता.”

केसरकर पुढे म्हणाले, “मी शिक्षणमंत्री असताना त्याला वैयक्तिकरीत्या मदत केली होती. मी स्वतः चेकद्वारे त्याला पैसे दिले होते. पण सरकारकडून जे पेमेंट येते, त्यासाठी ठरलेल्या औपचारिकता पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्याचा ‘दोन कोटी रुपये येणं आहे’ हा दावा मला योग्य वाटत नाही. त्याचे सर्व कागदपत्रे विभागाकडे असतील, त्यातूनच त्याची खात्री होऊ शकते. पण या सर्व बाबी असूनही, अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवणे योग्य नाही,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षण विभागाने २ कोटी रुपये बुडवले - रोहित आर्यचा आरोप

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रोहित आर्यने तत्कालीन शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले होते. त्याने म्हटले होते की 'माझी शाळा, सुंदर शाळा' ही कल्पना त्यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. ही कल्पना त्याने स्वतः तयार केली असून ती त्यांच्या 'लेट्स चेंज' या चित्रपटातून प्रेरित होती. त्याच्या मते, महाराष्ट्र सरकारने त्याच्या कल्पनेचा वापर केला, पण त्यांना श्रेय किंवा मोबदला दिला नाही. त्याने दावा केला की सरकारने त्यांच्या चित्रपटाच्या हक्कांचाही वापर केला आणि प्रकल्पाचे पूर्ण श्रेय स्वतःकडे घेतले.

आर्य याने असाही आरोप केला, की शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्याच्या फाईल्स थांबवून ठेवत त्याच्या पेमेंटला विलंब केला. या आधी आर्यने दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलनही केले होते. पण, त्यावेळी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आले. मात्र त्यानंतर आश्वासन पूर्ण न केल्याने त्याने इशारा दिला होता की, “जर मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर, त्यांचे स्वीय सचिव मंगेश शिंदे, तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तुषार महाजन आणि समीर सावंत हे जबाबदार असतील.”

अखेर या वादातून त्याने अपहरण करण्याचा आत्मघाती निर्णय घेतल्याचे समजते. पोलिसांनी कारवाई करत सर्वांची सुटका केली, पण चकमकीत रोहित आर्य ठार झाला.

logo
marathi.freepressjournal.in