

पवईत परिसरातील ‘आरए स्टुडिओ’मध्ये गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडलेल्या थरारक प्रसंगाने संपूर्ण मुंबई हादरली. अभिनयाच्या ऑडिशनच्या नावाखाली १७ अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलांची सुटका करताना झालेल्या चकमकीत आरोपीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तब्बल एक तास चाललेल्या या तणावपूर्ण नाट्यानंतर १९ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या कारवाईत आरोपी रोहित आर्य ठार झाला.
ऑडिशनच्या नावाखाली अपहरण
महावीर क्लासिक इमारतीतील ‘आरए स्टुडिओ’मध्ये गुरुवारी दुपारी १.४५ वाजता पवई पोलिसांना फोनवर माहिती मिळाली की, काही मुलांना एका व्यक्तीने ओलीस ठेवले आहे. पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी रोहित आर्यने सुमारे १५ वर्षे वयाच्या मुला-मुलींना 'वेब सिरीज ऑडिशन'च्या नावाखाली स्टुडिओत बोलावलं होतं.
स्टुडिओला आग लावण्याची धमकी
थोड्याच वेळात परिस्थिती बिघडली आणि आर्यने मुलांना आत बंद करून ठेवले. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून काही लोकांशी थेट बोलायची मागणी केली. “मला फक्त चर्चा करायची आहे, पैसे नकोत. जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी स्टुडिओला आग लावेन,” अशी धमकी त्याने दिली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रोहित आर्याकडे एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ होते. पोलिसांनी त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अधिकच आक्रमक होत गेला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर पवई पोलिस, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), बॉम्ब शोधक व निकामी पथक, तसेच अग्निशमन दलाने संयुक्तपणे कारवाई सुरू केली.
बोलणी फिस्कटली अन्
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान आर्यने अचानक एअरगनने मुलांकडे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी पोलिसांच्या टीमने तत्काळ कारवाई केली आणि गोळीबार झाला. यात आर्य जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलांची सुटका; कोणालाही इजा नाही
चकमकीनंतर स्टुडिओत प्रवेश करून पोलिसांनी आत अडकलेली १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि आणखी एक पुरुष अशी एकूण १९ जणांची सुरक्षित सुटका केली. “सर्व मुले सुखरूप असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे,” अशी माहिती सह पोलिस आयुक्त सत्यनारायणन यांनी दिली.
मुलांचे जीव वाचवणेच आमचं प्राधान्य
पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले, “ही अत्यंत आव्हानात्मक कारवाई होती. आम्ही त्याच्याशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तो मुलांना इजा करण्याच्या हालचाली करू लागला, तेव्हा तत्काळ निर्णय घ्यावा लागला. मुलांचे जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता होती.”
या घटनेबद्दल पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही गंभीर घटना आहे. तपास सुरु आहे आणि लवकरच सर्व तपशील जनतेसमोर मांडले जातील.”