पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये गुरुवारी संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने १७ अल्पवयीन मुलांसह दोन जणांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रसंग घडला. या घटनेने फिल्म इंडस्ट्रीपासून पालकांपर्यंत सर्वांच्याच मनात भीती निर्माण केली आहे. घटनेची माहिती मिळताच काही तासांतच पोलिसांनी सर्वांची सुटका केली, मात्र चकमकीत आरोपी रोहित आर्य ठार झाला. सरकारी कामाचे दोन कोटी रुपये थकीत असल्याने नैराश्यापोटी आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. या संपूर्ण थरारक घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या एका मुलीने आपला अनुभव सांगत त्या प्रसंगाची भयावहता उलगडून दाखवली आहे.
तो आधी फ्रेंडली होता...
मुंबई बाहेरून वर्कशॉपसाठी आलेल्या एका लहान मुलीने तेथे नेमकं काय घडलं याची माहिती 'एबीपी माझा'ला दिली. यावेळी तिने सांगितलं, "मी या वर्कशॉपसाठी आली होते कारण माझं ऑडिशन झालं होतं आणि सिलेक्शन झालं होतं. पाच दिवसांचं ट्रेनिंग असल्याचं सांगितलं गेलं होतं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं, तो (रोहित आर्य) आमच्याशी अगदी फ्रेंडली वागत होता. पण, शेवटच्या दिवशी अचानक सगळं बदललं," असं त्या मुलीने सांगितलं.
ती पुढे म्हणाली, “काल त्याने आम्हाला तीन गटांमध्ये विभागलं एक्झिट ग्रुप, रिसिव्ह ग्रुप आणि स्टुडिओ ग्रुप. एक्झिट ग्रुपवाल्यांना घरी सोडलं, पण आम्हाला सांगितलं की अजून एक दिवस वाढवला आहे म्हणून थांबा. आम्हाला संशयही आला नाही.”
“सकाळी आम्हाला वरच्या मजल्यावर एक एक करून पाठवलं. सुरुवातीला दरवाजा उघडा होता, पण नंतर त्याने तो बंद केला. आम्ही विचारायला लागलो की काय झालंय, वॉशरूमला जायचंय, पण त्याने सांगितलं की सीन चालू आहे, शांत बसा. त्यानंतर दरवाजा उघडला नाही. काही वेळाने खाली आमच्या आई-वडिलांचा आवाज ऐकू आला, माझी आजी आमच्या सोबत होती. तिला गरम होत असल्याने त्याने तिला एसी रूममध्ये बसवलं होतं. पण तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिने आई वडिलांना फोन केला होता आणि ती रडत होती."
बंदुकीचा धाक
पुढे तिने सांगितलं, की त्याच्याकडे गन होती. त्याने ती आमच्यासमोर ठेवली आणि सांगितलं, ‘कोणी जास्त बोललं, पळायचा प्रयत्न केला, तर परिणाम भोगाल’. त्यानंतर त्याने एक एक पालकांना फोन करून पैसे आणायला सांगितले. आम्ही सगळेच घाबरलो होतो.”
"त्यानंतर काही वेळाने एका पोलिसांनी काचेचा दरवाजा फोडून आम्हाला वाचवले. त्यावेळी तो काचेचा दरवाजा पडणार होता पण माझ्या आजीने तो पकडला. त्यामुळे आम्हाला इजा झाली नाही पण आजीला थोडा मार लागला" असे मुलीने सांगितले. रोहित आर्य आणि पोलिसांमधील चकमक ही त्यांच्या समोर घडली नसल्याने त्याबाबत माहीत नसल्याचे मुलीने सांगितले.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी सांगितलं की, रोहित आर्यने काही दिवसांपासून हा प्लॅन आखला होता. अभिनयाच्या ऑडिशनच्या नावाखाली त्याने मुलांना बोलावलं आणि नंतर पैशांसाठी ओलीस ठेवलं. घटनेचा सखोल तपास सुरू असून, त्याने एकट्याने हे केलं की इतर कोणी साथीदार होते, याचा शोध घेतला जात आहे.
