

निवडणुकांच्या रणधुमाळीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शुक्रवारी (दि.२६) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महाजन यांनी शिंदे गटात येताच ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली. "यापुढे शिंदेंवर टीका झाली, तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल," असा इशारा महाजन यांनी दिला.
राज ठाकरेंवर टीकास्त्र
महाजन म्हणाले, “एकनाथ शिंदे रात्री कितीही वाजता भेटायला तयार असतात; इतर काही जण ‘औषध’ घेऊन लवकर झोपतात,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
त्यांच्या नशिबी अंधारच...
“अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जाण्याची भूमिका घेत असतील, तरी त्यांच्या नशिबी अंधार टळणार नाही,” असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
शिंदेंचा मोठेपणा भावला म्हणून...
शिवसेनेत अधिकृत प्रवेशानंतर महाजन म्हणाले, “मी यापूर्वीही शिवसेनेचा उपनेता होतो. शिंदे साहेब पक्षप्रमुख असूनही स्वतःला शिवसेनेचा नेता मानतात. हा त्यांचा मोठेपणा मला भावला.” असे म्हणत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी मंगेश चिवटे यांचे आभार मानले.
रात्री दीड वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचतो तेव्हा...
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त करत महाजन म्हणाले, "शिंदे हिंदुत्वाबाबत सजग आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात जातीय तणाव असताना त्यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. अतिवृष्टीत एखादे गाव संकटात असताना रात्री दीड वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचतो, असा सक्रिय नेतृत्वाचा दाखला शिंदेंनी दिला," असे महाजन यांनी सांगितले.
वीस वर्षांचा दुरावा अवघ्या दहा मिनिटांत संपतो का?
“कंबरेवर हात ठेवून कुणी वारस ठरत नाही. शिंदे साहेबांनी आपल्या कामातून वारसा सिद्ध केला आहे. यापुढे शिंदेंवर टीका झाली, तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा महाजन यांनी दिला. वीस वर्षांचा दुरावा अवघ्या दहा मिनिटांत संपतो का, असा सवाल उपस्थित करत महाजन म्हणाले, "दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडले आहे. जागावाटप जाहीर झाल्यावर त्यांच्या पक्षात कोणी उरणार नाही," असा दावाही त्यांनी केला.
“आम्हीही मराठीच...
ठाकरे बंधूंचा रस मुंबई, ठाणे आणि नाशिक या महापालिकांपुरताच मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्राकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप महाजन यांनी केला. “आम्हीही मराठी आहोत; मग ते नेमकं कुठल्या मराठी माणसाचं बोलतात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.