''राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत''; प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

शिवसेना शिंदे गटाचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिले. हे पत्र त्यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केलं असून या पत्रात त्यांनी मनसे आणि ठाकरे गटावर टीका केली असून, 'मराठी'च्या नावावर सुरू असलेले राजकारण केवळ स्वार्थासाठी असल्याचे म्हंटले आहे.
''राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत''; प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
Published on

वरळी येथे शनिवारी (५ जुलै) ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. मराठी भाषेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनी एकत्र आले. यावेळी पुढेही एकत्र राहण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला. त्यांच्या युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यांच्या राजकीय एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक आणि रोखठोक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर ‘X’ वर पोस्ट केले असून, या पत्रातून त्यांनी मनसे आणि ठाकरे गटावर परखड शब्दांत टीका केली आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले की ''शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात, गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे, त्याबाबत माझ्या भावना पत्रातून व्यक्त केल्या आहेत.''

राज ठाकरे यांच्यावर टीका -

या पत्रात सरनाईकांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, ''मराठीचा मुद्दा' घेऊन, राज ठाकरेंनी २००६ मध्ये 'मनसे'ची स्थापना केली, त्याला आता १९ वर्ष झाली ..!! मराठीची परिस्थिती तीच आहे उलट अजून बिकटच झाली आहे! ज्या बडव्यांच्या नावाने छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत. त्यामागे कोणते राजकारण आहे; हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दुधखूळी नक्कीच नाही. आपल्या भाषणाला टाळ्या पडतात; परतुं, मते पडत नाहीत ती का? याचा विचार करुन ते थकले आणि बडव्यांना शरण गेले, असे आम्ही म्हणायचे का?''

पत्रात एकनाथ शिंदेंचं कौतुक -

सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाल्याचे अधोरेखित केले. त्यासाठी शिंदे यांनी स्वतः प्रयत्न केल्याचेही पत्रात म्हंटलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निधी, विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचे काम शिंदे यांनी केल्याचं पत्रात म्हंटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in