
भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात त्यांची भावजय प्रिया फुके यांनी पुन्हा एकदा थेट आक्रमक भूमिका घेत विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. आज सकाळी प्रिया फुके आपल्या दोन मुलांसह विधानभवनाबाहेर पोहोचल्या. मात्र, त्यांना विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच, त्यांना दोन्ही मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले.
माध्यमांशी संवाद साधताना प्रिया फुके यांनी ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भेट द्यावी. मी गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे वेळ मागतेय. पण ते भेटत नाहीयेत. परिणय फुकेसारख्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस सेफ करत आहेत, कशासाठी सेफ करत आहेत? माहिती नाही. परिणय फुके आमच्याबरोबर जे काही करत आहेत, त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा. आम्ही न्याय मागण्यासाठी इथे आलो आहोत,'' अशी प्रतिक्रिया दिली.
परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप -
प्रिया फुके यांनी यापूर्वीदेखील आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर त्या माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे पती संकेत फुके यांच्याशी २०१२ साली फसवणूक करून त्यांचे लग्न लावण्यात आले. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे किडनी प्रत्यारोपण झाले होते, मात्र हे सत्य त्यांच्यापासून लपवण्यात आले.
जेव्हा हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा प्रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. संकेत फुके यांचे २०२२ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील संकटे अधिकच वाढली. त्यांना कुटुंबातून बेदखल करण्यात आले. त्यानंतर प्रिया फुके यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यांच्या मुलाच्या कस्टडीसाठी त्यांना त्रास देण्यात आला. त्यांच्यावर अत्याचारासाठी लोकांना पाठवण्याची धमकीही देण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे.