१५ दिवसांत झोपडीधारकांना पात्र करा ;म्हाडाचे मुख्य अधिकारी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बोरीकर यांनी तातडीने म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडी धारकांनी पंधरा दिवसाच्या आत पात्र करा असे निर्देश दिले.
१५ दिवसांत झोपडीधारकांना पात्र करा ;म्हाडाचे मुख्य अधिकारी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
PM
Published on

मुंबई: कांदिवली पूर्व श्री समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने  गेल्या पंधरा वर्षापासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी  केला आहे. झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरापैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. या विरोधात संस्थेचे शिष्टमंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना भेटले. त्यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत पुरावे पाहून सर्व झोपडीधारकांना पात्र करण्याचे निर्देश  दिले. त्यामुळे अपात्र झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे.

विकासक दिनेश बन्सल यांच्या हुकूमशाहीमुळे झोपडीधारकांना घरापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. संस्थेने या झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा केला.पुरावे सादर केले. परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. ते  घरापासून वंचित तर आहेतच. परंतु त्यांना एसआरए योजनेअंतर्गत विकासकाकडून भाडे सुद्धा मिळालेले नाही. यामधील काही लोक श्रमजीवी आहेत.तर काही महिला अनेक घरची धुणीभांडी करून उपजीविका करणाऱ्या आहेत. त्या सर्व सभासदांना त्रास होत आहे. त्यामुळे ते हतबल झालेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी संस्थेशी आणि लोकप्रतिनिधी संपर्क करून न्यायाची मागणी केलेली आहे. त्यामुळे संस्थेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; मात्र तत्पूर्वीच मनसेचे बाळकृष्ण पालकर, आरपीआयचे हरीश मुत्तराज, राष्ट्रवादीचे विष्णू पवार, दिव्या विचारे, प्रकाश चव्हाण, व्यापारी असो.चे अध्यक्ष ओमप्रकाश जोशी,प्यारेलाल यादव, उमेश सिंग ठाकूर, मनोज आवटे, विजया रेड्डी नाथन,पुष्पा रेड्डी, अर्चना पोसवाल, सावित्री दुबे, या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

 'कुठल्याही प्रकारची हयगय नको'

बोरीकर यांनी तातडीने म्हाडा अधिकाऱ्यांना पाचारण करून अपात्र झोपडी धारकांनी पंधरा दिवसाच्या आत पात्र करा असे निर्देश दिले. यामध्ये 'कुठल्याही प्रकारची हयगय मी खपवून घेणार नाही आणि माझ्याकडे पुन्हा अशा तक्रारी नकोत' असे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. झोपडीधारकांनी आपले पुरावे सादर करताना फोटो काढून ते आपल्याकडे ठेवावेत. जर त्यावर कार्यवाही झाली नाहीतर पुन्हा आपण माझ्याकडे या असे सांगून त्यांनी शिष्टमंडळाचे समाधान केले. आता अधिकारी कशाप्रकारे कार्यवाही करतात. याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in