

मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली होती. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.१) या तक्रारीची दखल घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले. तर, ३० डिसेंबरचे ४ वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज (दि.२) सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्यांनी X माध्यमावर "सन्माननीय अध्यक्ष महोदय" अशी कॅप्शन देत राहुल नार्वेकर यांचा तोच व्हिडीओ शेअर केला आहे.
बघा व्हिडिओ -
कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ या तीन प्रभागांत नार्वेकर यांचे नातेवाईक बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. यावेळी इतर पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याचा तसेच अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली. संसदीय तसेच विधिमंडळातील संवैधानिक पदावरील व्यक्तींनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये, अशी प्रथा असतानाही नार्वेकरांनी त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.