लाइफलाईनवर पालिकेचा ‘फोकस’; पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ नये यासाठी कामाची झाडाझडती

हलक्या सरी बरसताच सखल भाग पाण्याखाली जातात आणि मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळख असलेली रेल्वे लोकल सेवा ठप्प होते.
लाइफलाईनवर पालिकेचा ‘फोकस’; पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ नये यासाठी कामाची झाडाझडती

मुंबई : हलक्या सरी बरसताच सखल भाग पाण्याखाली जातात आणि मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळख असलेली रेल्वे लोकल सेवा ठप्प होते. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची लाइफलाईन सुरळीत सुरू राहावी यासाठी मुंबई महापालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे हद्दीतील पावसाळ्यापूर्व कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.

शनिवार व रविवारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, चर्नी रोड स्थानक परिसरात सुरू असलेल्या कामांची झाडाझडती घेत ३१ मेपर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने रेल्वेसह पालिकेच्या संबंधित विभागांना दिले आहेत. दरम्यान, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल व चर्नी रोड परिसरात असलेल्या धोकादायक इमारतींना नोटीस देत तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे निर्देश पालिकेच्या परिमंडळ १च्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी संबंधितांना दिल्या.

मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य आव्हानांवर पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाय करण्याच्या दृष्टीने आयोजित दौऱ्यात डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, रेल्वे अतिरिक्त विभागीय अभियंता ए. के. मिश्रा यांच्यासह डी विभागातील विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

३१ मेपर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करा; पालिकेचे निर्देश

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. रेल्वे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या खात्यांमार्फत सुरू असलेली पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँटरोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे रेल्वे प्रशासनाने या बैठकीत उपस्थित केले होते. त्यानंतर संगीता हसनाळे यांनी रेल्वे स्थानकातील कामांची रविवारी झाडाझडती घेतली.

धोकादायक इमारतींना नोटीस

डी विभागातील ग्रँट रोड व चर्नी रोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देऊन इमारत दुरुस्तीची कार्यवाही करावी. तसेच धोकादायक इमारतींबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना इमारत आणि कारखाने विभागाला हसनाळे यांनी दिल्या. तसेच रेल्वे रुळालगत असलेल्या सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता करून परिसरातील कचरा, राडारोडा उचलण्यात यावा. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in