दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क सध्या दिवाळीच्या रोषणाईने उजळून निघाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला दीपोत्सव हा मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. रंगीबेरंगी दिवे, सजावट आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी दररोज हजारो नागरिक येथे गर्दी करत आहेत. मात्र, या दीपोत्सवावर यंदा श्रेयाचे राजकारण पेटले आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शिवाजी पार्कमधील फटाक्यांची आतषबाजी दाखवणारा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले “जर तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील आकर्षक फटाक्यांची आतषबाजी पाहिली नसेल, तर तुम्ही मुंबईतील एक अप्रतिम अनुभव गमावत आहात.”
या पोस्टमध्ये मनसेचा किंवा राज ठाकरे यांचा कोणताही उल्लेख नव्हता. मनसेच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरे यांनी कधीही या उपक्रमाचे वैयक्तिक श्रेय घेतले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत हा दीपोत्सव मनसे कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला आहे. आता सरकारने प्रचारासाठी त्याचाच वापर केल्याने पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
मनसेची पोस्ट जशीच्या तशी
महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे... दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे... हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील... पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता... नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . . आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं ! ! !
दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात दररोज संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी, संगीत आणि रोषणाईचे कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. दादर, परळ, महिम तसेच उपनगरांमधून येणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे. पोलिसांनी सुरक्षेची आणि वाहतुकीची विशेष व्यवस्था केली आहे. राजकीय वाद एकीकडे असला तरी, मुंबईकरांसाठी हा दीपोत्सव दिवाळीतील एक महत्त्वाचा आकर्षणबिंदू ठरला आहे.