
गेले चार दिवस मुसळधार पावसाने मुंबईकरांचे अक्षरशः हाल केले. शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला. रस्ते आणि ब्रिजवर पाणी साचले, रेल्वेसेवा ठप्प झाली आणि लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अचानक भेट घेतली. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे म्हणाले की, ''गेल्या काही महिन्यांपासून मी मुख्यमंत्र्यांशी काही महत्त्वाच्या विषयांवर बोलत होतो. साधारणपणे त्याचा कशा प्रकारे आराखडा आखता येईल? मी २०१४ ला ॲस्थेटिक विषयाशी एक डॉक्युमेंटरी केली होती, जी आजही यूटयूबवर आहे. जी मी इतर भाषांमध्येही करतोय. टाऊन प्लॅनिंग या गोष्टी माझ्या आवडीचे विषय आहेत. एका साहित्यिकांचं चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशातील भविष्य सांगतो. मला ते बदलावंस वाटतं, ते वाक्य असं असावं, तुमच्याकडे ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुमच्या देशाची परिस्थिती सांगतो.''
पुढे या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली हे राज ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ''आज जी शहरं आहेत; मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर. या बऱ्याचशा शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटची कामं होत आहेत, त्यात अनधिकृत गोष्टी पण होत आहेत. आज जिकडे ५० माणसं राहत होती, तिथे एका जागेत ५०० माणसं राहायला आली आहेत. माणसं वाढली आहेत, त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत, ट्रॅफिक वाढलं आहे. सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्या आहेत.''
पार्किंग व्यवस्थेत शिस्त नाही
''साधारणपे २६ जुलैला पाऊस पडला होता, तो ९०० मिमी इतका होता, काल परवा पाऊस पडला तो ४०० मिमी होता. त्या ४०० मिमीमध्ये मुंबईचा केआस बघितलं, तर लक्षात येईल की रस्ते कमी आहेत. ट्राफिकला शिस्त नाही. काय झालंय आपण कबुतर, हत्ती या गोष्टींमध्ये इतके अडकलोय, की या ज्या गंभीर समस्या आहेत त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी जे पार्किंग लॉट उभे केले पाहिजे सरकारकडून, पालिकेकडून तिथे लोकं जात नाहीत. तिथे गेलं पाहिजे. बाहेरून जी लोकं आली आहेत. ओला, उबेर चालवतात. त्यांना माहीतच नाहीये, इथे कशाप्रकारे गाड्या पार्क केल्या पाहिजेत. लोकांना शिस्त लागली पाहिजे. त्यासाठी मी छोटासा आराखडा मुख्यमंत्र्यांना दिला.''
नियमभंग करणाऱ्यावर कारवाई व्हावी
खेळाच्या मैदानाखाली पार्किंगची सोय करता येईल, लहान लहान मैदान आहेत, त्याखाली पार्किंगची व्यवस्था करता येईल, असे राज ठाकरे म्हणाले. मैदान जाणार नाहीत, मुलांसाठी ती तशीच राहतील, असे ते म्हणाले. त्यांनी पार्किंग आणि नो-पार्किंग क्षेत्र स्पष्ट दिसावे यासाठी रस्ते व पदपथांवर रंगकाम करण्याची सूचना दिली. नियमभंग करणाऱ्यांवर दंडाची रक्कम वाढवावी, जेणेकरून शिस्त निर्माण होईल, असेही ते म्हणाले. जशी मद्यपान करून वाहन चालवण्याबाबत दंड वाढवल्यानंतर जनजागृती झाली, तशीच व्यवस्था पार्किंग संदर्भात करावी, असे त्यांनी सुचवले.
अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त महत्त्वाची
“ज्यांना गाड्याची लायसन्स देताय त्यांना शिकवलं जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कसं वागायचं. त्यांना कुठल्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची भीती नाही. नको तेथे भीती दाखवतात, अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा. इथे गरजेचे आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. “ज्या प्रकारे जमिनी गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत, काय होणार आहे त्या धारावीमध्ये मला सांगा? कुठचे रस्ते होणार आहेत?” असा सवालही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी येथे राहणाऱ्या आणि बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांकडे या शहरातील शिस्तीची जाण नसल्याचे सांगत पार्किंग आणि वाहतूक शिस्तीबाबत त्यांना नियंत्रित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. शहर उद्ध्वस्त करणाऱ्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सुचवत त्यांनी फडणवीसांना एक आराखडा सादर केल्याचे सांगितले. या बैठकीला पोलीस आयुक्तही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या आराखड्याचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.