ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-"मला...

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती 'बेस्ट' ठरली नाही.
ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-"मला...
Published on

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती 'बेस्ट' ठरली नाही. बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलने तब्बल १४ जागा मिळवत बहुमत मिळवले. तर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागा मिळाल्या. या पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, हा विषय लहान आहे सांगत त्यांनी पराभवावर भाष्य करणं टाळल्याचे दिसून आले.

या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी ९ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. जवळपास पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली. सुरुवातीला ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी होती, याबाबत तर्कवितर्क लढवले गेले. मात्र लगेचच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया

पत्रकारांनी त्यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, राज ठाकरे म्हणाले, “हो मी वाचलं... काय आहे ते? मला माहितीच नाही हा विषय... निवडणुका स्थानिक आहेत.. पतपेढी का काय ना... ठीक आहे... छोट्या गोष्टी आहेत रे... तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवे असते.” असे ते म्हणाले.

तथापि, याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, “प्रत्येक शहराचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत. गाडी पार्क करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग लॉट उभारणे गरजेचे आहे. ज्यांना वाहन परवाने देता, त्यांना गाडी कुठे पार्क करायची हे शिकवले जात नाही. कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे या समस्या वाढत आहेत. सरकार अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवते. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा.''

logo
marathi.freepressjournal.in