

मुंबई : मतचोरीविरोधात मविआने सत्याचा मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र मविआचा निवडणुकीच्या तोंडावर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा कट उधळून लावला, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. राजकारणातील मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केल्याचे ते म्हणाले.
मविआचा हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठायला हवे असेही ते म्हणाले. गिरगाव चौपाटी जवळील उद्यानात भाजपच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले, त्यावेळी रवींद्र चव्हाण बोलत होते.
भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, योगेश सागर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय यांच्यासह अनेक आमदार, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या मूक आंदोलनात सहभागी झाले होते.
मतदार घोळाविरोधात याद्यांमधील महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत "सत्याचा मोर्चा" काढण्यात आला होता. तर भाजपने मूक मोर्चा आयोजित केला होता.
मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी मविआ नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी मविआला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे हा मोर्चा आहे अशी खिल्ली साटम यांनी उडवली. समाजात तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे. मतदारांचा अवमान करत मविआ रडीचा डाव खेळत आहे, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी हे मूक आंदोलन होते. विरोधक निवडणूक जिंकले की लोकशाही शाबूत असते, मात्र ते हरले की ईव्हीएमवर आरोप करत रान उठवतात. यापुढे विरोधकांची नौटंकी चालणार नाही. लोकांना सत्य सांगण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. 'मविआ'चा हा मोर्चा म्हणजे अस्तित्व दाखवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. सत्तेपासून दूर झालेल्या पक्षांचा राजकीय अंत नजिक आला आहे, असा घणाघात कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला.
ठाकरे बंधू वक्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे. प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती काम करत असताना मविआ अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्तीच्या मदतीने सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत.
रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष