सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्रात गाजलेल्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सोहेल शेख याला दुबईहून हद्दपार करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. २३) याबाबत माहिती दिली.
Published on

महाराष्ट्रात गाजलेल्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सोहेल शेख याला दुबईहून हद्दपार करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. २३) याबाबत माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेखला काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये स्थानिक सिस्टर एजन्सीने अटक केली होती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात प्रशासनाने त्याला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

सलीम डोला रॅकेटमधील महत्त्वाचा समन्वयक

पोलिसांच्या मते, मोहम्मद सलीम शेख हा दुबईस्थित आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील ड्रग्ज किंगपिन, दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय सलीम डोला याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. तो देशभरात मेफेड्रोन उत्पादनासाठी कारखाने उभारण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, या कृत्रिम अमली पदार्थाचा पुरवठा आणि वितरणासाठी विविध नेटवर्क तयार करत होता.

तपासात उघड झाले आहे की, शेख सांगली येथे चालणाऱ्या मोठ्या मेफेड्रोन उत्पादन युनिटच्या पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवत होता. यूएईमधील केमिकल पुरवठादारांमार्फत कच्चा माल भारतात आणला जात होता आणि सांगलीतील कारखान्यात त्याचे रूपांतर मेफेड्रोनमध्ये केले जात होते.

फेब्रुवारी २०२४ मध्ये उलगडले रॅकेट

या प्रकरणाचा तपास फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाला. त्या वेळी मुंबईतील कुर्ला परिसरातून परवीन शेख नावाच्या महिलेला ६४१ ग्रॅम मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती. चौकशीत परवीनने कबूल केले की, ती दुबईस्थित सलीम डोला आणि मोहम्मद सलीम शेख यांच्या सांगण्यावरून काम करत होती.

या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी रॅकेटचा विस्तार परदेशापर्यंत असल्याचे उघड केले आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतर दुबई प्रशासनाने मोहम्मद सलीम शेखला भारतात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

२५२ कोटींची जप्ती आणि १५ अटक

या प्रकरणात यापूर्वी सांगली जिल्ह्यातील एका उत्पादन युनिटवर छापा टाकून मुंबई पोलिसांनी २५२ कोटी रुपयांचे मेफेड्रोन आणि कच्चा माल जप्त केला होता. आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सलीम डोला याचा मुलगा ताहिर सलीम डोला आणि भाचा मुस्तफा मोहम्मद कुब्बावालाचा समावेश आहे.

पुढील तपासात उलगडणार परदेशी नेटवर्क

पोलिसांना शेखकडून या आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील इतर परदेशी संपर्क आणि आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, या रॅकेटमुळे राज्यात कृत्रिम अमली पदार्थांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून पुढील तपासात या जाळ्यामागील आर्थिक आणि परदेशी साखळी उघड होण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in