

मतदार याद्यांमधील गोंधळ, गैरव्यवहार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज (दि. १) मुंबईत विरोधी पक्षांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चासाठी चर्चगेट येथे पोहोचताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चक्क लोकल ट्रेनने प्रवास केला. गर्दीच्या वातावरणात सामान्य प्रवाशांमध्ये बसलेले ठाकरे यांचे हे दृश्य पाहून उपस्थितांनी जल्लोष केला.
१५ मिनिटांची प्रतीक्षा
राज ठाकरे यांनी दादर स्थानकावरून चर्चगेटपर्यंत पश्चिम रेल्वेच्या लोकलने प्रवास केला. दादर स्थानकावर ते जवळपास १५ मिनिटे लोकलची वाट पाहत उभे होते. लोकल आल्यानंतर त्यांनी कोणत्याही विशेष डब्यात न बसता थेट सामान्य प्रवाशांसोबत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. विंडो सीटवर बसून त्यांनी प्रवासाचा आनंद घेतला, तर प्रवाशांमध्ये त्यांना पाहण्यासाठी घोषणांचा आणि आनंदाचा जल्लोष सुरू झाला.
तिकिटावर ऑटोग्राफ द्या सर - प्रवाशाची विनंती
या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने आपले रेल्वे तिकिट पुढे करून राज ठाकरेंकडून ऑटोग्राफ घेतला. “हा ऑटोग्राफ मी फ्रेम करून घरात ठेवणार,” असे त्या प्रवाशाने सांगितले. राज ठाकरे यांनीही हसत त्याच्याशी संवाद साधला आणि इतर प्रवाशांशीही काही वेळ गप्पा मारल्या. या प्रसंगाचे व्हिडिओ आणि फोटो काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या प्रवासात मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हेही राज ठाकरेंसोबत होते. दादर स्थानकावर पोहोचताच मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणाबाजीने त्यांचे स्वागत केले. लोकलमधील प्रत्येक थांब्यावर प्रवाशांनी ठाकरे यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी ‘लोकल’चा पर्याय
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची शक्यता होती. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि सामान्य मुंबईकरांशी थेट संपर्क साधण्यासाठी राज ठाकरेंनी लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.