

मुंबई येथे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारांविरोधात विरोधक एकवटले. महाविकास आघाडी, मनसे, कामगार पक्ष अशा सर्व विरोधकांनी मिळून 'सत्याचा मोर्चा'त सहभाग घेतला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर थेट निशाणा साधला. दुबार मतदारांच्या मुद्द्यावर ते कागदी पुराव्यांसह मंचावर आले आणि म्हणाले, "नेहमी तुम्ही पुरावा मागता, आज पुरावा घेऊनच आलो आहे. काढ रे तो पडदा! हे सगळे दुबार मतदार आहेत!”
राज ठाकरे यांनी भाषणात उपस्थित आंदोलकांसमोर दुबार मतदारांची आकडेवारी मांडत थेट राज्य सरकारला "मग निवडणूक घेण्याची एवढी घाई का?" असा सवाल केला.
काय म्हणाले राज ठाकरे
भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. हा मतदारांना आणि दिल्लीपर्यंत समजवण्याचा मोर्चा आहे. आम्ही, उद्धव ठाकरे, शरद पवार, सगळेच याच विषयावर बोलतो आहोत. अगदी भाजपचे लोकसुद्धा मान्य करत आहेत की दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग ही निवडणूक घेण्याची घाई का करताय?"
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हा फार मोठा विषय नसला तरी लोकशाहीच्या मूलभूत पारदर्शकतेशी निगडीत असल्याने तो गंभीर आहे. ते म्हणाले, "साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि त्या पारदर्शक केल्यावर ज्या निवडणुका होतील त्यात यश कोणाचं? अपयश कोणाचं? सगळ्या गोष्टी मान्य. पण, सगळं लपूनछुपुन चालू आहे ते कशासाठी?"
दुबार मतदारांवर निशाणा
त्यांनी सोबत आणलेली मतदारांची यादी दाखवत म्हंटले, "खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत. हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी मुंबईच्या मलबार हिलमध्येही मतदान केलेलं आहे. असे लाखों लोकं आहेत महाराष्ट्रभर जे मतदानासाठी वापरले गेले. आता मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे. लोकं म्हणतात पुरावे कुठे आहेत?"
काढ ते कापड
यानंतर त्यांनी काही जिल्ह्यांतील मतदार याद्यांची आकडेवारी सादर करत पुरावे दाखवले. त्यांनी सांगितले, “मुंबई उत्तरमध्ये १७ लाख २९ हजार ४५६ मतदार आहेत, त्यापैकी ६२ हजार ३७० हे दुबार आहेत. नॉर्थ वेस्टमध्ये १६ लाख ७४ हजार ८६१ मतदारांपैकी ६० हजार २३१ दुबार आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये १५ लाख ९० हजार ७१० पैकी ९२ हजार ९८३ दुबार मतदार आहेत, तर नॉर्थ सेंट्रलमध्ये १६ लाख ८१ हजार ४१ पैकी ६३ हजार ७४० दुबार मतदार आहेत.”
राज ठाकरेंनी ही आकडेवारी सांगून म्हणाले, लोकं म्हणतील आकडे बोलून दाखवतील पुरावा कुठेय? मी आज पुरावा घेऊन आलोय.. त्यांनी काढ ते कापड म्हणत पेपरचा गठ्ठा दाखवत म्हंटले, हे सगळे दुबार मतदार आहेत.
अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडतो?
पुढे ते म्हणाले, "म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आहे तो. एवढे पुरावे दिल्यावर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले आहे जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणाला आहे घाई? पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडतो? मग जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याच्यात निवडणुका घ्या. त्याच्यातल्या त्याच्यात आटपून घ्यायचं आणि यश पदरी पाडायचं. याला निवडणुका म्हणतात? अशाने लोकशाही टिकेल?" असा सवाल त्यांनी केला.
आमदाराच्या भावाने २० हजार मतदार आणले
पुढे सत्ताधारी आमदारांच्या फसवणुकीवर भाष्य करत ठाकरे म्हणाले, "एका आमदारचा भाऊ सांगतो मी वीस हजार मतं बाहेरून आणली. म्हणजे यांची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा. एक आमदाराचा भाऊ सांगतो, म्हणजे आमदारच तो.. काहीही चालू आहे, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत, कोणीतरी सुलभ शौचालयमध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसलं की नोंदवायचं का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट संपूर्ण देशभर सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक मतदाराला समजलंय."
निवडून आलेल्यांनाच विश्वास नव्हता
ते म्हणाले, "मी २०१७ पासून ओरडून सांगतोय की यामध्ये गोंधळ आहे, गडबड आहे. अहो साधी गोष्ट २३२ आमदार निवडून आल्यावर जर महाराष्ट्रामध्ये मातब असेल, काहीच नसेल तर सगळेच मतदार गोंधळलेल्या अवस्थेत असतील. अहो निवडून आलेल्यांनाच निवडून आलेले चिमटे काढून बघत होते, मी कसा आलो निवडून? कारण त्यांची अगोदरच सोय झाली होती. त्यामुळे त्याला माहीत होतं मी निवडून येणार. या सगळ्या गोष्टी, कट कारस्थान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू आहे. जो मतदार उन्हातान्हात उभं राहून मतदान करतो त्याचा हा अपमान नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
तर बडव बडव बडवा...
शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन करत म्हटले, "जेव्हा कधी निवडणुका होतील त्यावेळी तुम्ही यायद्यांवर काम करा, घराघरात जा, लोकांचे चेहरे समजले पाहिजेत. त्यानंतर जर हे दुबार तिबार आले, तर तिथेच फोडून काढायचे, बडव बडव बडवायचे मग पोलिसांत देयचे तरच हे वठणीवर येतील."