ऐन दिवाळीत एका निष्पाप जीवाचा श्वास थांबला, पण त्याच्या वडिलांच्या एका सेवाभावी निर्णयाने इतरांना जीवनदान दिलं! वसईतील सत्यम दुबे या तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय संपूर्ण शहराच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला आहे. या निर्णयामुळे सत्यमचं नाव आता अनेकांच्या श्वासांमध्ये जिवंत राहणार आहे.
एकुलत्या एक मुलाचं निधन
२४ वर्षीय सत्यम संतोष दुबे हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. वसईचा हा तरुण अपघातात मृत्युमुखी पडला; मात्र त्याचे यकृत, मूत्रपिंड, पेशी आणि डोळ्यांचा कॉर्निया असे आजार असलेल्या गंभीर रुग्णांना दान करण्यात आले. त्यामुळे तो वसईतील सर्वात तरुण अवयवदाता ठरला असून, या अवयवांमुळे अनेकांना पुन्हा जगण्याची नवी संधी मिळाली आहे.
भीषण अपघातात मृत्यू
सत्यमचा १७ ऑक्टोबर रोजी वापीजवळ भीषण अपघात झाला. वसईत पालकांसोबत राहणारा सत्यम त्या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वापी येथील हरिया प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं. आशा न सोडता, कुटुंबाने त्याला नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात हलवलं, पण त्याची प्रकृती सुधारली नाही.
दु:खातही सेवाभाव
मुलाच्या निधनाचं दु:ख मनात दडपून सत्यमच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या धैर्याचं आणि संवेदनशीलतेचं कौतुक केलं. विशेषतः सत्यमच्या आईचं - ज्या मुलाच्या मृत्यूच्या वेदनेत असूनही इतरांना जीवनदान देण्याचा निर्धार त्यांनी केला.
‘ग्रीन कॉरिडॉर’ने वाचवला अनमोल वेळ
सत्यमचं यकृत नालासोपारा येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून गिरगाव येथील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलपर्यंत केवळ ४३ मिनिटांत पोहोचवण्यात आलं. दिवाळीच्या गर्दीतही मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार केला. दहिसर चेकनाक्यापासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, भुलाभाई देसाई रोड, सेंट स्टीफन्स चर्च जंक्शन, बाबुलनाथ मंदिर आणि सुखसागर जंक्शनपर्यंतचा मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्यात आला. पोलिसांच्या पायलट वाहनाने रुग्णवाहिकेला सुरक्षित मार्गदर्शन करत हा जीवदान देणारा अवयव योग्यवेळी पोहोचवला.
डॉक्टरांच्या मते, अशा तातडीच्या समन्वयामुळे जीवन आणि मृत्यू यात फरक पडतो. त्यांनी दुबे कुटुंबाच्या धैर्याचं आणि पोलिसांच्या तत्परतेचं विशेष कौतुक केलं.
आपल्या मुलाला वाचवू न शकल्याचं, त्याच्या मृत्यूचं दुःख असूनही, दुबे कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे सत्यमच्या रूपाने अनेक जीव वाचले आहेत.