आंबेडकरी विचारांचे असल्याने सरन्याधीशांचा अपमान; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा आरोप

सरन्यायाधीश भूषण गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.
Nana Patole
नाना पटोले संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले की, महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. मात्र आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. सर न्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे.

पटोले म्हणाले की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो. त्यांच्या दौऱ्याची माहिती आधीच दिलेली असते. सर न्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून युती सरकारने महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली आहे.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराची व्यक्ती सरन्यायाधीश झाली त्याचा आनंद आहे. सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का, असेही नाना पटोले म्हणाले.

फुले चित्रपट टॅक्स फ्री करा!

राज्य सरकार सर्वधर्मसमभाव मानत असेल तर महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत, मात्र फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in