

मुंबई : 'विमल इलायची'च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाचे अप्रत्यक्ष अथवा सरोगेट प्रमोशन होत असल्याचा प्रथमदर्शनी संशय FDA ने व्यक्त केला आहे. ११ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये तिघांना १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'विमल' ब्रँडशी पान मसाल्याचा संबंध असल्याचा FDA चा दावा
FDA च्या ग्रेटर मुंबई विभागाने 'विमल इलायची' च्या जाहिरातीची पाहणी केली. ही जाहिरात टीव्ही, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले. जाहिरातीमध्ये VIMAL Elaichi या नावाचा वापर करण्यात आल्याने त्याचा संबंध Vimal Pan Masala ब्रँडशी जोडला जाऊ शकतो, असे FDA ने म्हटले आहे.
'इलायची'च्या नावाखाली अप्रत्यक्ष जाहिरात?
FDA च्या मते, VIMAL हे नाव पान मसाल्याशी मोठ्या प्रमाणावर जोडलेले असल्याने Vimal Elaichi च्या जाहिरातीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच स्वतंत्र उत्पादनाच्या जाहिरातीच्या नावाखाली पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाच्या ब्रँडची ओळख आणि ग्राहकांमधील आकर्षण कायम ठेवण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा FDA चा प्रथमदर्शनी निष्कर्ष आहे.
१५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण द्या
११ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचा ब्रँड एंडोर्सर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. FDA ने ही नोटीस 'अंतिम इशारा' असल्याचेही नमूद केले आहे.
जाहिरात आणि सोशल मीडिया प्रमोशन थांबवण्याचे निर्देश
FDA ने तिन्ही अभिनेत्यांना Vimal Pan Masala/Elaichi शी संबंधित जाहिरातीतील सहभाग आणि प्रमोशन तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स, वेबसाइट्स आणि त्यांच्या नियंत्रणाखालील इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले संबंधित प्रमोशनल साहित्य हटवण्यास सांगितले आहे.
पुढे जाहिरातीच्या प्रसारणात सहकार्य न करण्याचे आदेश
याशिवाय जाहिरातीचे प्रसारण, प्रकाशन, प्रसार किंवा प्रमोशन करण्यासाठी यापुढे कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा मदत करू नये, असेही FDAने स्पष्ट केले आहे.
Vimal Elaichi स्वतंत्र उत्पादन आहे का?
FDA ने तिघांकडून Vimal Elaichi हे बाजारात स्वतंत्रपणे उपलब्ध असलेले उत्पादन आहे की पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाच्या ब्रँडचा विस्तार करण्यासाठी केलेले सरोगेट प्रमोशन आहे, याबाबत कागदोपत्री पुरावे मागितले आहेत.
एंडोर्समेंट कराराचीही मागणी
नोटीसमध्ये अभिनेत्यांकडून एंडोर्समेंट करार, जाहिरात मोहिमेची माहिती, उत्पादनाची माहिती, मानधन आणि पेमेंटशी संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. तसेच जाहिरात एजन्सी आणि ब्रँड मालकाची माहिती आणि जाहिरात करण्यापूर्वी अभिनेता किंवा त्यांच्या एजन्सीने कोणती पडताळणी केली, याचाही तपशील मागण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनांवर कारवाई
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न सुरक्षा आयुक्तांनी १३ जुलै रोजी जारी केलेला प्रतिबंध आदेशही महत्त्वाचा आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ३०(२)(अ) अंतर्गत जारी करण्यात आलेला हा आदेश एक वर्षासाठी लागू आहे. यात तंबाखू, निकोटीन आणि सुपारीवर आधारित काही प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
FSSAI आणि CCPA लाही माहिती
FDA ने या नोटीसेच्या प्रती FSSAI आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला (CCPA ही पाठवल्या आहेत. या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.
स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास पुढील कारवाई
निर्धारित १५ दिवसांच्या कालावधीत स्पष्टीकरण मिळाले नाही किंवा सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक आढळले नाही, तर पुढील कोणतीही नोटीस न देता कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा FDA ने दिला आहे. तिघांना वैयक्तिक सुनावणीची मागणी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
FDA च्या कारवाईला वेग
महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांविरोधात तपासणी व कारवाईच्या मोहिमा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 'विमल इलायची'च्या जाहिरातीप्रकरणी करण्यात आलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.