शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
काय आहे आरोप?
१८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सीरिजचे दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे. या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्या सारखे दिसणारे पात्र दाखवले गेले असून, त्याद्वारे त्यांच्या प्रतिमेची जाणूनबुजून बदनामी करण्यात आल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, सीरिजमध्ये ड्रग्जविरोधी अंमलबजावणी संस्थांना चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. एक 'सत्यमेव जयते' नामक पात्र दाखवले आहे. जे नंतर अश्लील हावभाव करते. हा प्रकार राष्ट्रीय घोषणेचा अपमान असून, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ अंतर्गत दंडनीय आहे. काही दृश्ये माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलमांचे उल्लंघन करतात, असा आरोप देखील करण्यात आला आहे.
मानहानीची रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला
या मानहानीच्या याचिकेत समीर वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण रक्कम त्यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ती उपयोगी पडेल.
आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्याशी संबंधित प्रकरण आधीच मुंबई उच्च न्यायालय आणि NDPS विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर नव्या मानहानीच्या खटल्यामुळे शाहरुख खान पुन्हा अडचणीत सापडला आहे.