''गद्दार कोणाला म्हणतो रे?'' शंभुराज देसाई आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ‘गद्दार’ या एका शब्दामुळे सभागृहात वातावरण इतकं तापलं, की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
''गद्दार कोणाला म्हणतो रे?'' शंभुराज देसाई आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी
Published on

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ‘गद्दार’ या एका शब्दामुळे सभागृहात वातावरण इतकं तापलं, की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

काय घडलं नेमकं?

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारला प्रश्न विचारला की, मराठी भाषिक नागरिकांना घर मिळण्यासाठी विशेष कायदा करण्याचा सरकारचा काही विचार आहे का? यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “२०१९ ते २०२२ या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अशा स्वरूपाचा कोणताही कायदा किंवा धोरण आणले गेले नव्हते.”

याच उत्तरामुळे अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि देसाईंना थेट 'गद्दार' असं संबोधलं. अनिल परब म्हणाले, त्यावेळी तुम्ही सरकारमध्ये होतात. तेव्हा तुम्ही गद्दारी करत होतात. हे ऐकून शंभुराज देसाई चिडले आणि चिडलेल्या शंभूराज देसाई यांनी तिखट प्रत्युत्तर देत म्हंटलं, की “गद्दार कुणाला म्हणतोस रे? बाहेर भेट, मग दाखवतो!” इतकंच नव्हे तर देसाईंनी परबांना “तुम्ही तिथे बूट चाटायचा प्रयत्न करत होता” असेही म्हंटले.

सभागृहाचे कामकाज थांबवावे लागले

वाद विकोपाला जात असल्याचं पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी वादग्रस्त शब्द सभागृहाच्या नोंदीतून वगळण्याचे आदेश दिले आणि सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.

सभागृहाबाहेरही आरोप-प्रत्यारोप

या संपूर्ण प्रकारावर बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्हालाही आमचा सन्मान आहे. आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत. कोणीही अपमान केला तर आम्ही डबल उत्तर देऊ.

logo
marathi.freepressjournal.in