
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांना आणखी एक पुरावा तपास यंत्रणेला प्राप्त झाला आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात आरोपीसह सीसीटिव्ही फुटेजमधील आरोपीचा चेहरा एकाच व्यक्तीचा असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या आरोपीबाबत येणाऱ्या वृत्ताबाबत आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जाते.
सैफ अलीच्या घरात चोरीच्या उद्देशाने शरीफुलने प्रवेश केला होता. मात्र चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफ अलीवर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चार दिवसांनी शरीफुलला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. मात्र सैफवर हल्ला करणारा आणि अटक आरोपीचा चेहरा मॅच होत नाही, माझ्या मुलाने सैफ अलीवर हल्ला केला नाही असा आरोप त्याच्या वडिलांनी केला होता. त्यामुळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळून जाणाऱ्या आरोपीचे फुटेज आणि शरीफुलचा चेहरा मॅच होत असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. त्यात पोलिसांकडून अधिकृत खुलासा होत नसल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.
याच दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले होते. त्याचा अहवाल अलीकडेच पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात दोन्ही व्यक्ती एकच असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. हा अहवाल नंतर वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह असल्याने हा पोलिसांसाठी एक भक्कम पुरावा मानला जात आहे. शरीफुलविरुद्ध वांद्रे पोलिसांकडे इतर काही पुरावे असून या पुराव्याच्या आधारे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.