वचननाम्यात ‘मराठी’ ऐवजी ‘मुंबईकर’ का? राज ठाकरे म्हणाले, "मराठी माणूस लिहिलं तर...

वचननाम्यात ‘मराठी’ऐवजी ‘मुंबईकर’ असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
वचननाम्यात ‘मराठी’ ऐवजी ‘मुंबईकर’ का? राज ठाकरे म्हणाले, "मराठी माणूस लिहिलं तर...
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपला संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. मात्र, या वचननाम्यात ‘मराठी’ऐवजी ‘मुंबईकर’ असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेना-मनसे युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, वचननाम्यात मराठी माणसासाठी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कारण वचननाम्यात अनेक ठिकाणी ‘मुंबईकर’ हा शब्द वापरण्यात आला असून ‘मराठी’ असा थेट उल्लेख दिसत नाही, असे पत्रकारांनी विचारले.

"मराठी माणूस लिहिलं तर...

प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “आम्हाला ‘मुंबईकर’ म्हणजे ‘मराठी माणूस’च अभिप्रेत आहे. मात्र, हा वचननामा निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. सध्याच्या परिस्थितीत ‘मराठी माणूस’ असा थेट उल्लेख केल्यास तो नामंजूर होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही ‘मुंबईकर’ हा शब्द वापरला आहे.”

मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आम्हाला सध्याच्या सरकारच्या काळातील परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे वचननामा मंजूर व्हावा यासाठी हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. पण आमचा उद्देश स्पष्ट आहे, मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच.”

या निमित्ताने, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात आले, ही गोष्टही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in