Dadar Dahihandi 2025 : शिवसागर गोविंदा पथकाचा ‘छावा’ देखावा ठरला आकर्षण; आयडीयलच्या दहीहंडीत संभाजी राजांच्या शौर्याचा इतिहास

राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईतही ठिकठिकाणी थरारक मानवी मनोरे रचले जात आहेत. दादरमधील प्रसिद्ध आयडियल बुक डेपोसमोरील दहीहंडी उत्सवात मालाड (पूर्व) येथील शिवसागर गोविंदा पथकाने अनोख्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Dadar Dahihandi 2025 : शिवसागर गोविंदा पथकाचा ‘छावा’ देखावा ठरला आकर्षण; आयडीयलच्या दहीहंडीत संभाजी राजांच्या शौर्याचा इतिहास
Photo - (Insta/@shiv__sagar_govinda_pathak)
Published on

राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईतही ठिकठिकाणी थरारक मानवी मनोरे रचले जात आहेत. दादरमधील प्रसिद्ध आयडियल बुक डेपोसमोरील दहीहंडी उत्सवात मालाड (पूर्व) येथील शिवसागर गोविंदा पथकाने अनोख्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या पथकाने तीन थरांवर उभारलेल्या मनोऱ्याच्या चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास उभा केला. संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करताना गोविंदांनी मावळ्यांच्या रूपात विविध प्रसंग रंगवले. यावेळी "छत्रपती संभाजी महाराज की जय"च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पथकाचे कौतुक केले.

शिवसागर पथक दरवर्षी दहीहंडीमध्ये सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे मानवी मनोऱ्यातून सादर करते. याआधी या पथकाने "गड आला पण सिंह गेला", महिला सबलीकरण आणि अफजलखान वध यांसारखे देखावे साकारून चर्चा रंगवली होती. यंदा मात्र तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सादर करण्यात आली.

शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बबन बोभाटे यांनी सांगितले की, “आमच्या पथकातील ३५० सदस्य गेल्या दीड महिन्यापासून या सादरीकरणाचा सराव करत होते. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचे बलिदान तरुणाईपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश होता.”

दादरमधील हा अनोखा ‘छावा’ थर आणि ऐतिहासिक देखावा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in