

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता देण्यासाठी ४१०.३० कोटी इतका निधी वितरीत करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
‘लाडकी बहीण’साठी शासनाने ३९६० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही.
मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य
वितरित निधीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत आयुक्त, समाजकल्याण आणि इतर संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे.