

अंतराळात घडणाऱ्या एका मोठ्या घडामोडीकडे सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे. सूर्यावरील शक्तिशाली उद्रेकामुळे निर्माण झालेला प्लाझ्मा आणि चुंबकीय ऊर्जेचा प्रचंड ढग पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यामुळे पृथ्वीवर तीव्र भूचुंबकीय वादळ (Geomagnetic Storm) निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वादळामुळे उपग्रह, जीपीएस आणि रेडिओ सेवांवर परिणाम होऊ शकतो. तसेच जगातील काही भागांमध्ये दुर्मिळ ऑरोरा पाहण्याची संधीही मिळू शकते.
सूर्याच्या पृष्ठभागावरील 'ऍक्टिव्ह रीजन ४४६१' या भागात M1.8 श्रेणीचा सौर स्फोट (Solar Flare) झाला. या स्फोटासोबत मोठ्या प्रमाणात चुंबकीय प्लाझ्माही अंतराळात फेकला गेला. हाच प्लाझ्माचा ढग आता पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. अमेरिकेच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने (SWPC) याबाबत G3 श्रेणीच्या तीव्र भूचुंबकीय वादळाचा इशारा दिला आहे.
हे सौर वादळ आज पृथ्वीच्या जवळ पोहोचण्याची शक्यता असून, रात्री उशिरा त्याचे परिणाम दिसू शकतात.
ऑरोरा म्हणजे काय?
सूर्याकडून आलेले कण पृथ्वीच्या वातावरणातील वायूंना धडकतात तेव्हा आकाशात हिरवे, जांभळे, लाल आणि गुलाबी रंगांचे प्रकाशपट्टे दिसतात. या नैसर्गिक प्रकाशखेळाला 'ऑरोरा' असे म्हटले जाते. सामान्यतः हा नजारा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशांमध्ये दिसतो.
मुंबईत ऑरोरा दिसणार का?
तज्ज्ञांच्या मते, वादळाची तीव्रता अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यास उत्तर भारतातील काही भागांत ऑरोरा दिसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र मुंबईत हा नजारा दिसण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. मुंबईतील प्रकाश प्रदूषण, हवामानाची स्थिती आणि वादळाची अंतिम तीव्रता यावर सर्व काही अवलंबून असेल.
कुठे दिसण्याची शक्यता अधिक?
उत्तर अमेरिका, मध्य युरोप, न्यूझीलंड आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये ऑरोरा दिसण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, अंतराळ हवामानावर लक्ष ठेवणाऱ्या संस्था या सौर वादळावर सतत नजर ठेवून असून त्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास सुरू आहे.