SpiceJet Flight Delay : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा संताप अनावर; १२ तासांपासून खोळंबा - VIDEOS

मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानांना १२ तासांहून अधिक विलंब झाल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. संतापलेल्या प्रवाशांनी काउंटरवर जाब विचारला. गोंधळाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
SpiceJet Flight Delay : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा संताप अनावर; १२ तासांपासून खोळंबा - VIDEOS
SpiceJet Flight Delay : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा संताप अनावर; १२ तासांपासून खोळंबा - VIDEOS
Published on: 

मुंबई :मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानांना झालेल्या विलंबामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. मंगळवारी (दि. १७) संध्याकाळपासून अनेक विमानांना विलंब झाला, तर काही उड्डाणं रद्द करण्यात आली. तब्बल १२ तासांहून अधिक काळ विमानांची वाट पाहावी लागल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. विमान नेमकं कधी उड्डाण करणार, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी स्पाइसजेटच्या काउंटरवर गर्दी करत जाब विचारला. या गोंधळाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

१२ तासांहून अधिक काळ विमानांचा खोळंबा

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत स्पाइसजेटचं एकही विमान मुंबई विमानतळावरून उड्डाण करू शकलं नसल्याचं प्रवाशांनी सांगितलं. रात्री ११.३० वाजता नियोजित असलेल्या विमानाचंही बोर्डिंग सुरू झालं नव्हतं. काही प्रवाशांना विमान उशिराने निघणार की रद्द झालं आहे, याची स्पष्ट माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अनेक तास वाट पाहूनही उत्तर मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली.

वसईहून आलेल्या प्रवाशाचा संताप

दरम्यान, वसईहून पाहुण्यांसह मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाने 'एक्स'वर पोस्ट करत स्पाइसजेटच्या सेवेवर संताप व्यक्त केला. त्याचं विमान दुपारी १२ वाजता नियोजित होतं. मात्र, विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाच्या वेळेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचं त्याने सांगितलं.

आपल्या पोस्टमध्ये त्याने स्पाइसजेटची सेवा अत्यंत निराशाजनक असल्याचं म्हटलं. पाहुण्यांसह वसईहून विमानतळावर आलो, मात्र येथे उभं राहण्याची वेळ आली आणि विमान कंपनीकडून एकही स्पष्ट उत्तर मिळालं नाही, अशी नाराजी त्याने व्यक्त केली.

दुसऱ्या पोस्टमध्येही त्याने विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. विमान रद्द झालं आहे, उशिराने निघणार आहे की उड्डाण करणार आहे, याची माहिती मिळवण्यासाठी प्रवासी वारंवार विचारणा करत होते. मात्र, काउंटरवरून योग्य उत्तर दिलं जात नव्हतं. बोर्डिंग पासही मिळत नसल्याचा आरोप त्याने केला.

विमानसेवेत अडचणी का निर्माण झाल्या?

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, मंगळवारपर्यंत मुंबईहून सुटणारी स्पाइसजेटची १२ नियोजित उड्डाणं रद्द करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून स्पाइसजेटला विमानांची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विमानतळाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीकडे सध्या कार्यरत विमानांची संख्या कमी असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनालाही विलंब होत असल्याचं वृत्त आहे. या सर्व अडचणींचा परिणाम विमानसेवेवर होत असल्याची माहिती आहे.

यापूर्वी दुबईमध्ये थकित देयकांमुळे स्पाइसजेटच्या चेक-इन सेवेत अडथळे निर्माण झाले होते. त्यानंतर दिल्ली आणि मुंबई विमानतळ प्रशासनानेही स्पाइसजेटच्या विमानसेवेत व्यत्यय येण्याची शक्यता व्यक्त करत प्रवाशांना विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, मुंबई विमानतळावरील या गोंधळाबाबत स्पाइसजेटकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)