थरथरत्या हाताने वडिलांनी दिला लेकाला शेवटचा निरोप; कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

अहमदाबाद विमान अपघातात निधन झालेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या ८८ वर्षीय वडिलांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सभरवाल यांनी वडिलांना वचन दिले होते, की ते नोकरी सोडून लवकरच त्यांची पूर्णवेळ काळजी करतील. मात्र, त्यांचे हे वचन पूर्ण झाले नाही. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताच पुष्कराज सभरवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले.
थरथरत्या हाताने वडिलांनी दिला लेकाला शेवटचा निरोप; कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
Published on

अहमदाबाद विमान अपघातात निधन झालेल्या कॅप्टन सुमित सभरवाल यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या ८८ वर्षीय वडिलांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सभरवाल यांनी वडिलांना वचन दिले होते, की ते नोकरी सोडून लवकरच त्यांची पूर्णवेळ काळजी करतील. मात्र, त्यांचे हे वचन पूर्ण झाले नाही. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताच पुष्कराज सभरवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले. थरथरते हात जोडून त्यांनी आपल्या लेकाला श्रद्धांजली दिली. हे क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे 'एआय-१७१' विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. यामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. ५६ वर्षीय कॅप्टन सुमित सभरवाल हे या विमानाचे मुख्य पायलट होते. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला.

डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटल्यानंतर मंगळवारी (१७ जून) सकाळी सभरवाल यांचे पार्थिव विमानाने मुंबईला आणण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव पवईतील जल वायु विहार येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यावेळी कॅप्टन सुमित यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते.

सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कराज हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातून (डीजीसीए) निवृत्त झाले आहेत. तर, त्यांचे दोन पुतणेही वैमानिक आहेत. दोन वर्षांआधी सुमित यांच्या आईचे निधन झाले होते. तर त्यांची बहीण दिल्ली येथे वास्तव्यास आहे. सुमित आणि त्यांचे वडील हे पवई येथे दोघेच राहत होते. वडिलांना सांभाळण्यासाठी काही महिन्यांतच ते निवृत्त होणार होते. मात्र, पित्याला दिलेले वचन त्यांना पूर्ण करता आले नाही.

कॅप्टन सुमित सभरवाल यांना ८,२०० तासांचा विमान प्रवासाचा अनुभव होता. त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) 'मेडे' कॉल पाठवला होता. तसेच, अनुभवी तज्ञांच्या मते विमान कोसळण्याची स्थिती पाहता सुमित यांनी शेवटपर्यंत विमान उडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न त्यांचे असफल राहिले.

logo
marathi.freepressjournal.in