रोज पाच लाख घरांच्या सर्वेक्षणाचे टार्गेट; प्रत्येक घराचा डेटा सुरक्षित - सुधाकर शिंदे, पहिल्या दिवशी अडीच लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

मंगळवारी पहिल्या दिवशी २ लाख ६५ घरांचे घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र ३९ लाख घरांचे पुढील ७ दिवसांत रोज पाच लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे टार्गेट आहे.
रोज पाच लाख घरांच्या सर्वेक्षणाचे टार्गेट;  प्रत्येक घराचा डेटा सुरक्षित - सुधाकर शिंदे,  पहिल्या दिवशी अडीच लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला मंगळवार, २३ जानेवारीपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लॉगिन व पासवर्डमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. तरी मंगळवारी पहिल्या दिवशी २ लाख ६५ घरांचे घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र ३९ लाख घरांचे पुढील ७ दिवसांत रोज पाच लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे टार्गेट आहे. यासाठी मुंबई पालिकेच्या विविध विभागाचे तब्बल ३० हजार कर्मचारी सर्वेक्षणात कार्यरत आहेत. या सर्वेक्षणात गोळा करण्यात येणारा प्रत्येक घराचा डेटा सेफ आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईसह राज्यभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. २३ ते ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश असून, मुंबईत एकूण ३९ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ३० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, एका कर्मचाऱ्याला रोज १५० घरांचे सर्वेक्षण करण्याचे टार्गेट दिले आहे. मागसवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यात येत असून, पालिकेच्या टीमला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबईकरांना केले आहे.

ज्या घरांचे आरक्षण झाल्याची नोंद आहे, घरांचे सर्वेक्षण करण्यात वेळ लागत नाही, मात्र ज्या घरांचे आरक्षण नसेल त्याठिकाणी वेळ लागतो. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेत ९२ हजार अधिकारी व कर्मचारी असून, त्यापैकी ३० हजार कर्मचारी सर्वेक्षणाचे टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे आहेत सर्वेक्षणातील प्रश्न!

  • तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?

  • तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पध्दत आहे का ?

  • तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का?

  • तुमच्या समाजात विधवा स्त्रीया औक्षण करू शकतात का?

  • तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?

  • तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी-कुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का ?

जरांगेच्या मोर्चासाठी पालिकेची सज्जता

मराठा आरक्षणावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचा मोर्चा आझाद मैदानावर येण्याची शक्यता लक्षात घेता आंदोलनकर्त्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे, असेही डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

सहीचा गैरवापर नाही!

एका घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीची कोऱ्या पेपर वर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर तो पेपर त्या सदस्याला परत देण्यात येणार आहे. कोऱ्या पेपर वर सही केलेल्या पेपरचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

रजिस्ट्रेशन होत नाही !

मंगळवार २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु सर्वेक्षण झालेल्या घरांचे रजिस्ट्रेशन होत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. मंगळवारी जी उत्तर विभागात ८६३ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले, परंतु रजिस्ट्रेशन झाले नाही. तर एम पूर्व विभागात २९६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले, मात्र रजिस्ट्रेशन झाले नाही. तर बुधवार २४ जानेवारी रोजी जी साऊथ विभागात १५७ हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले, मात्र रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

सहकार्यासाठी सोसायट्यांना पत्र

मुंबईत ३९ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात येत असून, पालिकेच्या टीमला सहकार्य करावे यासाठी पालिकेच्या वॉर्ड स्तरावर प्रत्येक सोसायट्यांना पत्र दिल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

कामावर ताण

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील ३० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी सर्वेक्षणात अडकल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असून उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द

३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश असल्याने सुट्टीच्या दिवशी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in