
शाळेतील जुन्या मित्रावर विश्वास ठेवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. TCS या नामांकित आयटी कंपनीत उपाध्यक्ष असल्याचा बनाव करत, संबंधित वर्गमित्राने तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव संदीप धनावडे (वय ४२, रा. पारसी कॉलनी, दादर) असून, दीपिका पाटील (वय ४१, रा. चेंबूर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दीपिका या Wipro Ltd मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, तर संदीप हा त्यांच्या शाळेतील वर्गमित्र आहे.
‘TCS’ चा उपाध्यक्ष असल्याचा खोटा दावा -
शाळेनंतर २०१९ मध्ये या दोघांची पुन्हा भेट झाली. यावेळी संदीपने BKC येथील TCS मध्ये उपाध्यक्ष असल्याचे दीपिका यांना सांगितले. त्याला मासिक ६ लाख रुपयांचा पगार असल्याचा दावा केला. काही काळाने त्याने आपले बँक खाते आयकर विभागाने गोठवले असून त्यात ३३ कोटी रुपये अडकल्याचा बनाव केला. हे खाते 'अनलॉक' करण्यासाठी २.५ ते ३ कोटी रुपये गरजेचे असल्याचेही सांगितले.
मार्च २०१९ ते जुलै २०२१ दरम्यान, संदीपने आर्थिक मदतीसाठी दीपिका यांचे मन वळवले. जुन्या मैत्रीसाठी दीपिका यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली. या मदतीच्या बदल्यात संदीपने दीपिका यांना आश्वासन दिले की, तो दादर फाईव्ह गार्डन्सजवळील ‘माउंट प्लेझंट’ येथील फ्लॅट किंवा शिवाजी पार्कजवळील साकेतमधील फ्लॅट त्यांच्या नावावर करून देईल. विश्वास वाढवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रं दाखवली; ज्यात विक्री करार, शेअर सर्टिफिकेट आणि दीपिका यांच्या मुलीचं नॉमिनी म्हणून नाव असलेली मालमत्तेची कागदपत्रं होती.
दीपिका यांनी ७६ लाख रुपये मित्रांकडून उधार घेऊन, तर ४९ लाख रुपये सोन्याचे दागिने विकून संदीपला दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका यांनी धनावडेच्या ICICI बँकेच्या खात्यात ३८.३१ लाख रुपये थेट ट्रान्सफर केले. त्याशिवाय २४.३० लाख रुपये एटीएमद्वारे रोख दिले आणि उर्वरित १३.४० लाख रुपये प्रत्यक्षरित्या चेंबूर, BKC, आंबेडकर गार्डन अशा विविध ठिकाणी दिले.
पण एवढी रक्कम दिल्यानंतरही ना फ्लॅट मिळाला, ना पैसे परत आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीपिका यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस तपास सुरु -
सध्या आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची, दाखवलेल्या मालमत्तेची व कागदपत्रांची सखोल चौकशी सुरु असून, ते बनावट आहेत की नाही, याची पडताळणी केली जात आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.