शिवसेना उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि ज्येष्ठ शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांची सून असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी (दि.१५) भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शिवसेना उबाठासाठी, विशेषतः मुंबईच्या पश्चिम उपनगरांत, मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षांतराबाबत चर्चा सुरू होती. भाजपातील सूत्रांनुसार, त्यांनी यावर्षी सुरुवातीलाच भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी शिवसेना उबाठातील नेतृत्वाने त्यांना पक्षात थांबवण्यासाठी महिला संघटकपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, संघटनात्मक पद मिळूनही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
भावनिक पोस्टद्वारे शिवसेना उबाठाला निरोप
शिवसेना उबाठाचा राजीनामा देताना तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.“नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत…
वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही! जय महाराष्ट्र,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
त्यांनी सादर केलेल्या निवेदनात करत म्हटले, "एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला."
पतीच्या हत्येने आयुष्य बदलले
आपल्या निवेदनात त्यांनी पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा उल्लेख करत तो क्षण आयुष्याला कलाटणी देणारा ठरल्याचे सांगितले.
"एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे." असे तेजस्वी घोसाळकर यांनी निवेदनात म्हटले.
मला अशी ताकद हवी आहे जी...
पुढे त्या म्हणाल्या की, "कठीण काळात मिळालेल्या पाठबळाबद्दल त्या कृतज्ञ आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत निर्भयपणे आणि प्रभावीपणे काम करणे अधिक कठीण होत चालले आहे. मला अशी ताकद हवी आहे जी उघडपणे आणि ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहील,” असे सांगत त्यांनी हा निर्णय अनुभवातून घेतल्याचे, कुठल्याही कटुतेतून घेतला नाही," असे स्पष्ट केले.
समाजसेवेचा निर्धार कायम
"पक्ष बदलला तरी समाजसेवेची बांधिलकी कायम राहील" असे आश्वासन देत समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करणे हेच आता माझे एकमेव ध्येय आहे. जात, धर्म किंवा पक्षभेद न करता नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचा निर्धार तेजस्वी घोसाळकर यांनी केला.
तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकांत दहिसर-बोरिवली पट्ट्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागात घोसाळकर कुटुंबाचा पारंपरिक प्रभाव मानला जातो.