
भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. तर, ही नियुक्ती केवळ सद्भावनेतून असल्याची प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी मे महिन्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या काही काळापासून तेजस्वी घोसाळकर या बँकेच्या संचालकपदासाठी प्रयत्नशील होत्या. अखेर काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वी संचालकपदी त्यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर होते. मात्र, अभिषेक यांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्दैवी हत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती. तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपकडून संचालकपदावर समावेश झाल्याने त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
ही नियुक्ती केवळ सद्भावनेतून - दरेकर
मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तेजस्वी घोसाळकर यांच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “ही नियुक्ती केवळ सद्भावनेतून करण्यात आली आहे. रिक्त पद भरणं आवश्यक होतं आणि संचालक मंडळाने सर्वसंमतीने हा निर्णय घेतला,” असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांची ही निवड उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.