ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे नातेसंबंध फुलताना दिसत आहेत. गेल्या चार महिन्यात शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे अनेकदा एकत्र आले आहेत.
ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं
Published on

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचे नातेसंबंध फुलताना दिसत आहेत. गेल्या चार महिन्यात शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे अनेकदा एकत्र आले आहेत. यंदा बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधु एकत्र दिवाळी साजरी करतच आहेत. त्यातच आजचा भाऊबीजेचा सणही त्यांच्यासाठी खास ठरला आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी एकत्रित सहकुटुंब हजेरी लावली.

या प्रसंगी जयजयवंती यांनी दोन्ही भावांचे एकत्र औक्षण केले आणि तो क्षण ठाकरे कुटुंबासाठी भावनिक ठरला. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच सणाच्या उत्सवात एकत्र दिसले. त्यामुळे केवळ कौटुंबिकच नव्हे तर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

कौटुंबिक स्नेहबंध पुन्हा दृढ

भाऊबीज सोहळ्याला राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्यासह तर उद्धव ठाकरे देखील पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्या सोबत उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबातील स्नेह वाढताना दिसत आहे. गणेशोत्सव, मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस, दीपोत्सव आणि आता भाऊबीज हे सगळे सण ठाकरे कुटुंबाने एकत्र साजरे केले आहेत. मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटनही प्रथमच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठींना केवळ कौटुंबिक नव्हे, तर संभाव्य राजकीय युतीचे संकेत म्हणूनही पाहिले जात आहे.

गेल्या चार महिन्यांत ठाकरे बंधूंची ही दहावी भेट असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे युतीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in