

दंतचिकित्सक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दातांशी संबंधित रुग्णालय, उपकरणं आणि पांढरा कोट असं काहीसं चित्र उभं राहतं. पण, ठाण्याजवळ राहणारं दंतचिकित्सक दाम्पत्य सरिता आणि पी. व्ही. सुब्रमण्यम यांनी या चौकटीबाहेर जाऊन निसर्ग आणि वन्यजीवांशी अतूट नातं जोडलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येयच ठरवलं आहे, “वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करायची, तेही सौरऊर्जेच्या माध्यमातून!”
सौरऊर्जेवर चालणारे पाणीपंप - तहानलेल्या जीवांना जीवनदान
आजवर या दाम्पत्याने देशभरातील २८ जंगलांमध्ये तब्बल १९३ सौरऊर्जेवर चालणारे पाणीपंप बसवले आहेत. वाघ, सिंह, हरीण, बिबटे आणि असंख्य प्राणी उन्हाळ्याच्या दाहक महिन्यांमध्ये या पंपांमुळे तहानमुक्त राहतात. प्रत्येक पंपाचा खर्च सुमारे ४ ते ५ लाख असून, येत्या काळात अजून २०० पंप बसवण्याचं त्यांचं ध्येय आहे. या सौर पंपांमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत टिकून राहतात, पाणवठे कोरडे पडत नाहीत आणि परिसंस्था संतुलित राहते. एका दाम्पत्याच्या स्वप्नातून निर्माण झालेले हे पाणवठे आता हजारो जीवांचं आयुष्य वाचवत आहेत.
लहानपणीच निसर्गाशी ओढ
सुब्रमण्यम यांना लहानपणापासूनच जंगल आणि प्राण्यांविषयी प्रचंड आकर्षण होतं. विद्यार्थीदशेत ते वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या शिबिरांमध्ये सहभागी होत असत. १९९४ मध्ये सरिताशी विवाह झाल्यानंतर हे प्रेम दोघांचं समान ध्येय बनलं. एकत्रितपणे त्यांनी भारतातील कॉर्बेट, बांदीपूर, रणथंबोर, काझीरंगा, ताडोबा जवळपास प्रत्येक प्रमुख जंगलाला भेट दिली. २००६ मध्ये कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये भेटलेल्या निरंकर यादव यांच्या माध्यमातून त्यांना पक्षी निरीक्षणाचं वेड लागलं आणि जंगलाशी त्यांचं नातं अधिक दृढ झालं.
मानव-प्राणी संघर्षाकडे नवा दृष्टिकोन
सरिताच्या मते, “भारतीय संस्कृतीत मानव आणि प्राणी हे विरोधक नाहीत, ते सहजीवनाचे भागीदार आहेत.” आपल्या पुराणकथांमधील देवी दुर्गा वाघावर आरूढ आहे, भगवान अय्यप्पा वाघासोबत चालतात. हे मानव-प्राणी सुसंवादाचं प्रतीक आहे. ब्रिटिश राजवटीत झालेल्या वनतोडीमुळे आणि बाहेरील मजुरांच्या येण्यानं या नैसर्गिक नात्याला धक्का बसला आणि तिथूनच ‘संघर्ष’ ही संकल्पना उदयास आली. सरिता सांगतात, “खरं तर हा संघर्ष नाही, तो फक्त मानवाच्या लोभाचा परिणाम आहे.”
आजारपणातून उमललेलं ध्येय
२०१७ हे वर्ष या दाम्पत्यांच्या आयुष्यात मोठं वळण घेऊन आलं. सरिताला दर ४५ दिवसांनी डेंग्यूचा तीव्र झटका येऊ लागला. ती पूर्णपणे खाटेवर खिळली, पण जंगलाविषयीचं तिचं प्रेम कणभरही कमी झालं नाही. या दु:खानेच तिच्या ध्येयाला नवी दिशा दिली. त्याच काळात त्यांनी ‘अर्थ (Earth) ब्रिगेड फाऊंडेशन’ ची स्थापना केली. या संस्थेद्वारे देशभरात सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवण्याचं मोठं काम हाती घेण्यात आलं. २०१८ मध्ये पहिला पंप कर्नाटकातील बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात बसवण्यात आला, आणि त्यानंतर या कार्याला वेग आला.
आज या उपक्रमामुळे अनेक जंगलांतील परिसंस्था पुनर्जीवित झाली आहे. पाणी उपलब्ध झाल्याने प्राण्यांची स्थलांतरं कमी झाली, अन्नसाखळी संतुलित झाली आणि मानव–प्राणी संघर्षातही घट झाली. देशभरातील पर्यावरणप्रेमी, वनाधिकारी आणि स्वयंसेवी संस्था आता त्यांच्या कार्यात सहकार्य करत आहेत.